Now yogesh Gogawale may emerge as compromise candidate for Lok Sabha | Sarkarnama

पुण्यातून लोकसभेसाठी आता  योगेश गोगावलेंच्या नावाचीही  चर्चा 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

अनिल शिरोळे गेल्या चार वर्षात कोणत्याही कॉंट्रोव्हरसीमध्ये सापडलेले नाहीत. त्यांची विधाने मवाळ असली तरी वादग्रस्त नसतात .

पुणे : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे पुण्यातील जागेसाठी भारतीय जनता पार्टीकडून नवनवी नावे समोर येऊ लागली आहेत. यातील काहीजण स्वत:हून इच्छुक आहेत. तर काहीजणांची नावे तडजोडीचे उमेदवार म्हणून पुढे आणली जात आहेत.

 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले व माजी खासदार प्रदीप रावत यांची नावे आता नव्याने तडजोडीचे उमेदवार म्हणून येऊ लागली आहेत. 

विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वाधिक सशक्त दावा असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल शिरोळे गेल्या चार वर्षात कोणत्याही कॉंट्रोव्हरसीमध्ये सापडलेले नाहीत. त्यांची विधाने मवाळ असली तरी वादग्रस्त नसतात . मूळचे गोपीनाथ मुंडे गटाचे असलेलले शिरोळे राज्यातील सर्वच भाजप नेत्यांमध्ये मिसळतात . 

गिरीश बापट यांना खासदारकीला पाठवून पुण्यातील त्याचा प्रभाव कमी करावा अशी भाजपमधील एका गटाची इच्छा होती त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चा अधूनमधून सुरु होतात . 

खासदार शिरोळे यांच्यानंतर  पालकमंत्री गिरीश बापट आणि  संजय काकडे हे प्रबळ उमेदवार ठरतात .त्यातही  गिरीश बापट हे सर्वाधिक  प्रबळ उमेदवार ठरतात .   गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यातले मतभेद वेळोवेळी उघड झालेले आहेत .त्यामुळे काकडे आणि बापट  वादात  जागा धोक्यात येऊ नये असे भाजपच्या नेत्यांचे मत आहे . त्यामुळे बापट - काकडे  गटाला चालेल असा तडजोडीचा उमेदवार कोण असावा याबाबत भाजपतर्फे चाचपणी  सुरु आहे . 

 उमेदवार बदलायचे ठरले तर माजी खासदार प्रदीप रावत, शहराध्यक्ष योगेश गोगावले व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापैकी एकाचे नाव तडजोडीची उमेदवार म्हणून येऊ शकते ,  असे या सूत्रांनी सांगितले. 

पालकमंत्री बापट यांच्या पुढाकारानेच तीन वर्षापूर्वी गोगावले यांना शहराध्यक्ष करण्यात आले. मात्र आता गोगावले स्वत:च लोकसभेचे संभाव्य उमेदवार होऊ लागल्याने बापट यांच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे महत्वाचे ठरेल . विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात गोगावले यांनी शहरभरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत संपर्काचा सपाटा लावला होता . 

खासदार काकडे यांनी भाजपाकडून लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. विद्यमान खासदार यांचा दावा सर्वत सशक्त मानण्यात येत आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर माजी खासदार प्रदीप रावत व केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या नावाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे पुण्यातून खासदार होण्यासाठी आधीच्या तीन नावांमध्ये गोगावले, रावत व जावडेकर यांच्या नावाची भर पडल्याने ही संख्या आता तब्बल सहावर पोचली आहे. 

 

संबंधित लेख