Now we have to say that save girls from BJP leaders | Sarkarnama

आता भाजपच्या नेत्यांपासूनच बेटी बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे : अशोक चव्हाण 

सरकारनामा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आहे. भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का?

-अशोक चव्हाण

सोलापूर :  " एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' म्हणतात आणि दुसरीकडे भाजपचे आमदार तरूणांना मुलगी पळवून आणण्यासाठी मदत करण्याची भाषा बोलतात.  आता भाजपच्या नेत्यांपासून बेटी बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे ", अशी टीका काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली . 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त श्री. चव्हाण मंगळवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी कॉंग्रेस भवनात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही  उपस्थित होते.  

श्री . अशोक चव्हाण म्हणाले,"भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आहे. भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का? त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. या संदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांसमोर प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. कदम यांच्यावर कारवाई होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील.''  

सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत विद्यमान सरकार का गप्प आहे, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. 
श्री. चव्हाण म्हणाले," सनातन संस्थेवर बंदी घालण्याची आम्ही मागणी केली. मात्र त्यात यशस्वी झालो नाही. मात्र गेल्या चार वर्षांपासून विद्यमान सरकार गप्प का आहे त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. या संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात आम्ही तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही.''

 

संबंधित लेख