Now Pramod Rathod Challenges Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांनी मतीनच्या सभागृहातील वर्तनावर बोलावे- प्रमोद राठोड 

जगदीश पानसरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मतीनला कायदेशीर मदत करणार असे त्यांनी जाहीर केले आहे. तेव्हा  मतीनच्या सभागृहातील वर्तनाला त्यांचा व पक्षाचा पाठिंबा आहे का हे देखील त्यांनी स्पष्ट केले पाहिजे .   -   प्रमोद राठोड

औरंगाबादः नगरसेवक सय्यद मतीन याच्या बाबात एमआयएमची भूमिका नेमकी काय आहे ? हे आमदार इम्तियाज जलील यांनी आता स्पष्ट करावे. एक वर्ष स्थानबध्दतेची कारवाई झाल्यानंतर मतीनला पक्ष सगळी कायदेशीर मदत करेल असे ते सांगतात.

याचाच दुसरा अर्थ असा होतो की मतीन याने सभागृहात केलेल्या गैरवर्तनाला त्यांचा व पक्षाचा पाठिंबा आहे, असा आरोप भाजपचे गटनेते माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास विरोध करून सभागृहात त्यांच्याबद्दल एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने अपशब्द काढले होते. यावर सर्वात प्रथम भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी मतीनला कानफटावले होते. त्यानंतर इतर नगरसेवकांनी मतीनला बेदम मारहाण केली होती. 

या प्रकरणावरून भाजप व एमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सय्यद मतीन यांच्यावर दाखल असलेले विविध गुन्हे आणि त्याचे सभागृहातील तसेच बाहेरील वर्तन यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानूसार नुकतीच मतीनवर एमपीडीए अंतर्गत एक वर्ष स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, आमदार इम्तियाज जलील यांनी भाजप नगरसेवकांना पोलीसांकडून झालेली अटक व सुटका यावर आक्षेप घेत पोलीसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. तसेच पुराव्यासह पोलीसांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला होता. मतीन याच्या स्थानबध्दतेच्या कारवाईनंतर देखील त्याला सगळ्या प्रकारची कायदेशीर मदत पुरववणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे. 

नेमका यावर आक्षेप घेत भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी एमआयएमने सय्यद मतीन याच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान इम्तियाज जलील यांना दिले. देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल त्याच्या निधनानंतर एमआयएमचा नगरसेवक सभागृहात तोंडाला येईल ते बडबडतो, आणि त्या पक्षाचे आमदार त्याची बाजू घेतात. कधी ते म्हणात सय्यद मतीन पक्षाचा गुन्हेगार आहे, पण त्याला सभागृहात मारहाण करणारे देखील दोषी आहेत. 

मुळात श्रध्दांजली सभेला मतीनने विरोध केला नसता तर पुढचा प्रकार घडलाच नसता. आपल्या पक्षाचा नगरसेवक सभागृहात काय भूमिका घेणार आहे हे नेत्यांना माहित नाही हे पटण्या सारखे नाही. सभागृहात झालेल्या मारहाणीवर बोलणारे इम्तियाज जलील सय्यद मतीन याने अटलबिहारी वाजपेयींच्या केलेल्या अपमानावर किंवा त्यांच्या वक्तव्यावर काहीच बोलत नाहीत याचे आश्‍चर्य वाटते. 

 

संबंधित लेख