Now congress appoints a committee for voter list managenmet | Sarkarnama

आता कॉंग्रेसची मतदार नोंदणीमध्ये घोळ टाळण्यासाठी समिती

सरकारनामा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबईच्या सर्व मतदारसंघांतील 20 लाख मतदारांची नावे यादीमधून वगळण्यात आली आहेत. मतदार यादी बनवताना मोठा घोळ झाला आहे.

-संजय निरुपम

मुंबई  : मुंबईतील सर्व मतदार संघांमध्ये 1 सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. या मतदार नोंदणीत घोळ होऊ नये; तसेच खरा मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी मुंबई कॉंग्रेसतर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शना खाली स्थापन केलेल्या या समितीत आमदार नसीम खान, भाई जगताप, माजी आमदार बाबा सिद्दिकी, अशोक जाधव, चरणसिंग सप्रा, मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र उपाध्याय, मुंबई कॉंग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर यांचा समावेश आहे.

संजय निरुपम म्हणाले की, मुंबईच्या सर्व मतदारसंघांतील 20 लाख मतदारांची नावे यादीमधून वगळण्यात आली आहेत. मतदार यादी बनवताना मोठा घोळ झाला आहे. भाजप सरकारचे हे षड्‌यंत्र आहे.

यामुळे प्रामाणिक मतदाराचा मतदान हक्क हिरावला जात आहे. मंगळवारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यादीतून वगळलेल्या नागरिकांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबईत नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. ही नोंदणी सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई कॉंग्रेसतर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख