काॅंग्रेसमध्ये तरुण नेतृत्त्व नाही...तेच तेच `गोटे`पुन्हा पुन्हा पदांवर : शिवसेना

साठ वर्षे सत्ता भोगल्यावर विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणे हे काँग्रेसचे कर्तव्यच ठरते. लोकसभेत काँग्रेसची इतकी घसरण झाली की, विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जाही त्या पक्षाला मिळाला नाही. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आहे. बाळासाहेब थोरात यांना एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभे करावे लागेल- शिवसेना
काॅंग्रेसमध्ये तरुण नेतृत्त्व नाही...तेच तेच `गोटे`पुन्हा पुन्हा पदांवर : शिवसेना

पुणे : बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे जुनेजाणते नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, सहकारातले ज्ञानी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांना मिळाले, पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून काॅंग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. ``काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण गेले व थोरात आले. अर्थात त्यामुळे असा काय फरक पडणार आहे? काँग्रेसचे आभाळ फाटून पार जमीनदोस्त झाले आहे. पक्ष जमिनीवर शिल्लक नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसची वतनदारी केली, सर्वोच्च पदे मिळवली असे सर्व प्रमुख लोक महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काँग्रेसचा त्याग करीत आहेत. महाराष्ट्रातही वेगळे काही घडताना दिसत नाही. काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून विचार आणि संस्कृती आहे असे सतत सांगितले जाते. हा विचार, संस्कृती आणि बरेच काही भाजप किंवा शिवसेनेत रोजच विलीन होताना दिसत आहे. काँग्रेसला राजकीय भविष्य उरलेले नाही,``असा टोला लगावण्यात आळा आहे.

काॅंग्रेसच्या बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे. सत्ताधारी म्हणून सोडाच, पण विरोधी पक्ष म्हणून तरी काँग्रेसने धड जबाबदारी पार पाडली आहे असे दिसत नाही. राहुल गांधी यांच्या रिकाम्या जागी काँग्रेसला ‘नगास नग’ तर मिळालेला नाहीच, पण महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन महिना उलटून गेला तरी नवा प्रदेशाध्यक्ष मिळत नव्हता. अखेर आता त्या पदावर बाळासाहेब थोरात विराजमान झाले, पण त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रात ‘जात’निहाय पाच कार्याध्यक्षही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसने एक नव्हे, तर सहा अध्यक्ष नेमले आहेत. काँग्रेसच्या डोक्यातील जात व धर्माचे खूळ काही जात नाही. विदर्भातील नितीन राऊत (अनुसूचित जाती), विदर्भाच्याच यशोमती ठाकूर (इतर मागासवर्गीय), मुजफ्फर हुसेन (मुस्लिम), विश्वजित कदम (मराठा), बसवराज पाटील (लिंगायत) अशी ही जात पंचायत काँग्रेसने नेमली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यापैकी एकही समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला दिसत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काँग्रेसची धुरा सांभाळून पक्ष पुढे नेईल असे नवतरुण नेतृत्व काँग्रेस पक्षात उरलेले नाही. तेच तेच घासून गुळगुळीत झालेले ‘गोटे’ पुनः पुन्हा पदावर बसवले जात आहेत. काँग्रेस असेल किंवा अन्य कोणी, संसदेत व विधानसभेत विधायक विरोधी पक्ष असावा या मताचे आम्ही आहोत. साठ वर्षे सत्ता भोगल्यावर विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणे हे काँग्रेसचे कर्तव्यच ठरते. लोकसभेत काँग्रेसची इतकी घसरण झाली की, विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जाही त्या पक्षाला मिळाला नाही. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आहे. बाळासाहेब थोरात यांना एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभे करावे लागेल, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com