भेंडवळ घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही; दिशाभूल थांबवावी : महाराष्ट्र अंनिसची भूमिका

भेंडवळ घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही; दिशाभूल थांबवावी : महाराष्ट्र अंनिसची भूमिका

पुणे :  पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या (जि. बुलढाणा) घट मांडणीच्या भाकीताला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नसल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका अभ्यासगटाने जाहीर केले आहे.

याबाबत अंनिसने आपली भूमिका जाहीर केली आहे. अक्षयतृतियेच्या दिवशी (काल) जळगांव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावातील घट मांडणीची प्रथा बघण्यासाठी व या मांडणीमागील निष्कर्षांचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक चमू प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, बुलडाणा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष आंबेकर, नरेंद्र लांजेवार, निलकुमार बंगाळे, पंजाबराव गायकवाड, निलेश चिंचोले, रूपराव पाटील इत्यादींच्या चमुने घटमांडणीची प्रत्यक्ष पाहणी केली.

अविनाश पाटील यांनी त्यांचा अनुभव समाजमाध्यमांत व्यक्त केला आहे. तो जसाच्या तसा पुढीलप्रमाणे :

अक्षय तृतीयेला सूर्यास्तापूर्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी रामदास वाघ व सारंगधर बळीराम वाघ यांच्या हस्ते घट मांडणी करण्यात आली. एका दीड फुट खोल गड्ड्यात चार मातीच्या ढेकळांवर पाण्याने भरलेली मातीची घागर व त्या घागरीवर पापड, भजा, वडा, सांडई, कुरडई, करंजी व त्याखाली विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते. या घटाच्या तीन फूट अंतरावर गोल रिंगणात अठरा धान्य मांडली जातात. त्यामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडई, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वटाणा इत्यादीचा समावेश असतो. दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी या मांडणीमध्ये झालेल्या बदलावरून भविष्य वर्तविण्यात येते. भविष्य वर्तविणारे पुंजाजी रामदास वाघ किंवा त्यापूर्वी भविष्य वर्तविणारे रामदास वाघ हे किंवा त्यांच्या पूर्वजांनी कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. भविष्य वर्तविणारे निरक्षर आहेत. ही बाब पुंजाजी रामदास वाघ यांनी प्रत्यक्ष समितीसमोर उघड केली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भविष्य वर्तविण्याच्या प्रकारावर आक्षेप घेतला असून या भविष्य कथनाच्या प्रकाराला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही. घट मांडणीच्या परिसरात स्त्रियांच्या प्रवेशाला बंदी आहे. आजच्या स्त्री-पुरूष समानतेच्या युगात घट मांडणीच्या परिसरात स्त्रियांना मज्जाव करणे ही सनातनी वृत्ती आहे. पूजेचे साहित्य तयार करण्यात स्त्रियांचा सहभाग चालतो, परंतु स्त्रियांचा वावर या परिसरात का चालत नाही, असा प्रश्न महाराष्ट्र अंनिसने उपस्थित केला आहे.

तीनशे वर्षांपासून निरक्षर असणाऱ्या वाघ कुटुंबियांकडे भाकीत व्यक्त करण्याचे काम आहे. हे काम म्हणजे वैज्ञानिक युगामध्ये केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे भाकीत करण्याचे कंत्राट दिल्यासारखे आहे. तीनशे वर्षांची परंपरा असल्याचा उल्लेख होत असला तरी तिनशे वर्षांचा लिखित स्वरूपातील केलेले भाष्य किंवा त्याचा आलेला पडताळा याचा कोणताच पुरावा भविष्य कथन करणाऱ्यांनी ठेवलेला नाही. उघड्यावर शेतामध्ये काही पदार्थ घालून घट मांडणे व दुसऱ्या दिवशी त्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या झालेल्या बदलाचा आधार घेऊन देशाचे भविष्य वर्तविणे ही पद्धत अयोग्य आहे. शत्रुची घुसखोरी, पावसाचे प्रमाण, आर्थिक उलाढाल, देशाच्या प्रमुखाचा कार्यकाळ, शत्रुंची घुसखोरी कधी-कोठून आणि कशी होणार, पाऊस किती आणि कोठे पडणार हे स्पष्टपणे भाकीत केले तरच त्याचा पडताळा घेता येतो. असे भाकीत मात्र भेंडवळमध्ये होत नाही.

संदिग्धता पाळणे हे ज्योतिष्यवाले आणि भविष्यवाल्यांची खरी खासियत आहे. देशात लोकशाही असतानाही देशाच्या राजाला धोका आहे, हे संबोधणे लोकशाही राज्यव्यवस्थेला योग्य नाही. तीनशे वर्षांपासून परंपरा म्हणून जरी भविष्य कथन करीत असले तरी त्यात कोणताही ठोस असा आधार नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने संदिग्धता असणाऱ्या विधानांवर भरोसा न ठेवता शास्त्रीय आधार असणाऱ्या हवामान खात्यावर विश्वास ठेवावा. सध्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे. या विज्ञान-तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हवामान खाते प्रभावीपणे अंदाज वर्तवितात म्हणजे संदिग्धता असणाऱ्या भाकीतांवर सर्वसामान्य जनता विश्वास ठेवणार नाही. घटमांडणीच्या या अंदाजाबाबत कृषि विभागाने तसेच हवामान खात्यानेही आपली जबाबदारी ओळखून दरवर्षी यावर भाष्य करावे, अशी मागणी महाराष्ट् अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com