राजू शेट्टींच्या सल्ल्याची गरज नाही़; भाजपमध्ये समाधानी : शिवाजीराव नाईक

राजू शेट्टींच्या सल्ल्याची गरज नाही़; भाजपमध्ये समाधानी : शिवाजीराव नाईक

शिराळा : मी भाजपचाच आहे. इथे समाधानी आहे. एवढा बलाढ्य पक्ष सोडून दुसरीकडे जाण्यासाठी मला खासदार राजू शेट्टींचा सल्ला घेण्याची गरज काय? त्यांनी 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारीची दिलेली ऑफर मी नाकारली होती. भाजप सोडून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, "मी कोणाच्या सांगण्यावरून पक्ष बदलत नाही. कार्यकर्त्यांच्या विचाराने निर्णय घेतो. 2014 मध्ये कायम अपक्ष लढणे सोयीचे नसल्याने कार्यकर्त्यांनी मिळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पक्षानेही उमेदवारी दिली. भाजपबाबतचे लोकांचे मत, आम्ही केलेली कामे व लोकसंपर्कामुळे विजयी झालो. भाजपमध्ये जाण्याचा सल्ला त्यावेळी शेट्टींनी दिला नव्हता. उलट त्यांनी स्वाभिमानीच्या उमेदवारीची ऑफर दिली होती. तरीही त्यांनी पाठिंबा देऊन मदत केली.'

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, उत्तम पाटील, भरत निकम, पार्थ शेटे, युवराज यादव उपस्थित होते.

दुसऱ्याला उमेदवारी दिली तरी...

आम्ही मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी करीत आहोत. पक्षाला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य केले नाही. लोकसभा, विधानसभेला पक्षाचेच काम करू. 2019 मध्ये दुसऱ्याला उमेदवारी दिली तरी ही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विकासाला चालना देण्यासाठी भरीव निधी दिला, असे आमदार नाईक यांनी सांगितले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा अनुभव आम्हाला आहे. त्यांचा विचारही मनात येत नाही. मंत्रिपद नसल्याने नाराज असल्याची व पक्ष बदलाची अफवा पसरवून लोकांत संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. पक्षाने मंत्रिपदापेक्षा शिराळ्याला विकासनिधी जास्त दिला. त्यामुळे पक्षबदल व नाराजीचा संबंध नाही. पदापेक्षा मिळालेला निधी महत्त्वाचा आहे, असे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.

पक्षाची सभासद नोंदणी व पक्ष बांधणीत आम्हीच आघाडीवर आहोत. त्यामुळे पक्ष बदलाचा विचार मनात तरी कसा येईल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com