नांदेड पाच वर्षापासून मंत्रीपदापासून वंचित

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड व हिंगोलीमधून भाजप आणि शिवसेनेचे खासदार झाले. त्यामुळे राज्यमंत्रीमंडळात नांदेडला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा नांदेडला मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. गेली अनेक वर्षे नांदेडला मंत्रीपद मिळाले होते पण आता युतीच्या काळात गेल्या पाच वर्षापासून नांदेड मंत्रीपदापासून वंचितच राहिले आहे. त्याचबरोबर आता आॅक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे पुढेही तीन महिन्यात मंत्रीपद मिळण्याची शक्यता नसल्याचेच स्पष्ट आहे.
नांदेड पाच वर्षापासून मंत्रीपदापासून वंचित

नांदेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड व हिंगोलीमधून भाजप आणि शिवसेनेचे खासदार झाले. त्यामुळे राज्यमंत्रीमंडळात नांदेडला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा नांदेडला मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. गेली अनेक वर्षे नांदेडला मंत्रीपद मिळाले होते पण आता युतीच्या काळात गेल्या पाच वर्षापासून नांदेड मंत्रीपदापासून वंचितच राहिले आहे. त्याचबरोबर आता आॅक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे पुढेही तीन महिन्यात मंत्रीपद मिळण्याची शक्यता नसल्याचेच स्पष्ट आहे. 

नांदेड म्हणजे पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण आणि आता अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असेच समीकरण होते. गेल्या अनेक वर्षापासून चव्हाण कुटुंबियांकडे सत्ता आहे. पित्रा आणि पुत्र राज्याचे एकदा नव्हे तर प्रत्येकी दोनदा मुख्यमंत्री झाले आहेत आणि असा प्रयोग देशात फक्त एकदाच झाला आहे. मागील वेळेस २०१४ च्या मोदी लाटेत अशोक चव्हाण खासदार झाले होते. आता २०१९ मध्ये मात्र अशोक चव्हाण यांना ४० हजाराच्या मताधिक्याने पराभूत करुन भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार झाले आहेत. त्याचबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातही मागील वेळेस कॉंग्रेसचे ॲड. राजीव सातव खासदार होते. यावेळेस मात्र तेथे शिवसेनेचे हेमंत पाटील खासदार झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे चार, कॉंग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादी व भाजपचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. त्याचबरोबर विधानपरिषदेवर कॉंग्रेसचे अमर राजूरकर हे निवडून आले आहेत तसेच विधानपरिषदेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना घेण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. एक नांदेड ज्यामध्ये नांदेड दक्षिण, उत्तर, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उर्वरित किनवट आणि हदगाव हे दोन विधानसभा हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहेत तर लोहा कंधार विधानसभा हा लातूर लोकसभा मतदारसंघात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड आणि लातूर येथे भाजपचे तर हिंगोलीत शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. 

भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षापासून नांदेडवर विशेष लक्ष ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडवर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव होऊ शकला, हे तितकेच सत्य आहे. मात्र, भाजपला भरभरुन मते नांदेडकरांनी टाकूनही नांदेडच्या वाट्याला मात्र केंद्रात आणि राज्यातही मंत्रीपद मिळू शकले नाही. शेजारच्या लातूर, यवतमाळ तसेच बीड जिल्ह्यातही मंत्रीपद आहे. मात्र नांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली हे तीन जिल्हे मात्र मंत्रीपदापासून वंचितच राहिले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार झाले तर लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडचे भाजपचे खासदार झाले आहेत. त्यामुळे दोन आमदारांना खासदार होण्याची संधी मिळाली आहे. आता जिल्ह्यातील नऊ पैकी तीन काँग्रेसचे व एक राष्ट्रवादीचा आमदार आहे. तर शिवसेनेचे दोन आणि भाजपचा एक आमदार आहे. त्यामध्ये शिवसेनेकडून तीनदा आमदार झालेला सुभाष साबणे यांना मंत्रीपदासाठी अनुभवी म्हणून पद देता आले असते किंवा भाजपकडून विधानपरिषदेवर असलेले जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर किंवा मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनाही संधी देता आली असती. मात्र सेना आणि भाजप या सत्ताधाऱ्यांनी नांदेडकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. 

पाच वर्षात तीन पालकमंत्री
गेल्या पाच वर्षात नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. २०१४ च्या आधी नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांना राज्यमंत्रीपद आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजप सेनेची सत्ता आली पण मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे नांदेडला गेल्या पाच वर्षात शिवसेनेचे तीन पालकमंत्री मिळाले. त्यात दिवाकर रावते, अर्जुन खोतकर आणि सध्या असलेले रामदास कदम यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com