no hurdle of maratha agitaion for BJP | Sarkarnama

मराठा आंदोलनानंतरही भाजपची कामगिरी दमदार : सांगली, जळगावने दिला फडणविसांना आधार

योगेश कुटे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली आणि जळगावमध्ये भाजपने सत्ता हस्तगत केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हायसे वाटणार आहे. नराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचा भाजपला फटका बसणार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला या आंदोलनामुळे धोका, या चर्चा आता थांबतील. 

पुणे : मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर पेटलेले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगली आणि जळगाव येथील महापालिकातील निवडणुकीच्या प्रचाराला जाऊ शकले नाही. तरी या दोन्ही महापालिकांत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. 

जळगावमध्ये सुरेश जैन यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा धुव्वा उडवत भाजपने एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. दुसरीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीला सांगलीत हादरे देण्यात भाजप यशस्वी झाला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, मालेगाव, वसई-विरार आणि धुळे या आठ महापालिका वगळता राज्यातील इतर १९ महापालिकांत भाजपची सत्ता आहे. त्यात औरंबाबाद, नगर आणि कल्याण-डोंबिवली या तीन महापालिकांत भाजपची शिवसेनेसोबत सत्ता आहे. इतर चौदा ठिकाणी पक्षाची स्वबळावर सत्ता आहे. 

एखादा पक्ष इतक्या महापालिकांत एकाच वेळी सत्तेवर असण्याची गेल्या काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपचे राज्यात स्टार प्रचारक असतात. कोट्यवधी रूपयांचे पॅकेज ते प्रत्येक शहरासाठी जाहीर करत असतात. सांगली आणि जळगाव महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर फडणवीस यांची आंदोलकांनी कोंडी केली. त्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी पंढरपूर येथे जाता आले नाही. त्यानंतर मराठा आंदोलन चिघळले. त्यामुळे त्यांना सांगली जिल्हा बंद असल्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.

या साऱ्या परिस्थितीमुळे फडणवीस यांना या दोन्ही शहरांत थेट जाहीर सभा घेता आली नाही. मुख्यमंत्री प्रचाराला गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न होता. तसेच आंदोलक रस्त्यावर उतरलेले असताना मुख्यमंत्री मात्र प्रचारात गुंग, अशीही टीका झाली असती. फडणवीस यांनी थेट त्या शहरांत जाणे टाळले.  मग व्हिडीओद्वारे मतदारांशी संपर्क साधला. दोन्ही शहरांच्या विकासासाठी भाजप काय करणार, याबाबतचा व्हीडीओ त्यांनी जारी केला.

सांगलीची जबाबदारी त्यांचे सहकारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि जळगावची गिरीश महाजन यांच्याकडे होती. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर महापालिका काबीज करण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यात ते अयशस्वी झाले. मात्र सांगलीची महापालिका जिंकून त्यांनी आपली राजकीय चतुराई सिद्ध केली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपला निवडणुकीत फटका बसणार का, याची या महापालिका निवडणुकीत चाचणी होणार होती. त्यातही मराठा बहुल असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली पालिकेत त्याचा काही परिणाम होणार का, याची शंका होती. मात्र भाजपने या शंका धुळीस मिळवत चांगली कामगिरी केली. सांगलीत ७८ पैकी ३९ जागांवर भाजप विजय मिळविण्याच्या वाटेवर आहे.

जळगाव भागात मराठा समाज हा बहुसंख्य नाही. त्यामुळे येथे या आंदोलनाचा फार मोठा परिणाम अपेक्षित नव्हता. येथे शिवसेनेचे बस्तान होते. ते मोडून काढण्यात महाजन यशस्वी ठरले. जळगावमध्ये ७५ पैकी ५७ जागा मिळवून एकहाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचा विपरीत परिणाम भाजपच्या कामगिरीवर झाला नसल्याचे या दोन निवडणुकांत दिसून आले.  आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने धनगर, मराठा हे समाज भाजप तसेच एकनाथ खडसेंना दूर सारल्याने लेवा पाटील समाज भाजपवर नाराज असल्याचा मुद्दाही या दोन निवडणुकांच्या निकालाने सध्या तरी दूर सारला गेला आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीतच या नाराजीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ शकतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख