No Banner Posters on Nandkishore Mudada's Birthday | Sarkarnama

हार - तुरे अन॒ बॅनरबाजी ऐवजी मुंदडांच्या वाढदिवसाला जमले सव्वा लाख; दुष्काळी निधीसाठी देणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा मतदार संघात चांगला दबदबा आहे. दिवंगत पत्नी डॉ. विमल मुंदडा यांच्या सलग पाच वेळा विजयात त्यांचा मोठा वाटा होता. सध्याही घरात आमदारकी नसली तरी सामाजिक, धार्मिक कार्यांच्या माध्यमातून मतदार संघातील दांडगा संपर्क त्यांनी कमी होऊ दिलेला नाही. कुठलाही कार्यक्रमाचे आमंत्रण मिळताच ते जातात. तर, कोणाचाही वाढदिवस असला तर घरी बोलावून किंवा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ते शुभेच्छा देतात.

अंबाजोगाई (जि. बीड) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे वाढदिवसाला कोणीही बॅनर लाऊ नका, हार - तुरे आणू नका, त्याऐवजी दुष्काळी उपाय योजनांसाठी मदत करण्याच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळून एक लाख २७ हजार रुपये जमले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हा निधी देऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा मतदार संघात चांगला दबदबा आहे. दिवंगत पत्नी डॉ. विमल मुंदडा यांच्या सलग पाच वेळा विजयात त्यांचा मोठा वाटा होता. सध्याही घरात आमदारकी नसली तरी सामाजिक, धार्मिक कार्यांच्या माध्यमातून मतदार संघातील दांडगा संपर्क त्यांनी कमी होऊ दिलेला नाही. कुठलाही कार्यक्रमाचे आमंत्रण मिळताच ते जातात. तर, कोणाचाही वाढदिवस असला तर घरी बोलावून किंवा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ते शुभेच्छा देतात. इतर सुख - दु:खाच्या कार्यक्रमांनाही त्यांची अवर्जून हजेरी असते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची गर्दी होती. 

त्यांचा वाढदिवस यंदा विजयादशमीच्या मुहूर्तावर होता. त्यांनी वाढदिवसाला ‘कोणीही हार - तुरे आणू नयेत, डिजीटल बॅनर लाऊ नयेत, शक्य असेल तर दुष्काळी निधीस सहकार्यक करावे’ असे आवाहन समर्थकांना केले होते. वाढदिवसा दिवशी ते घरीच थांबून होते. त्यांनी समोरच टेबलावर एक मदत निधीसाठीची पेटीही तयार करुन ठेवली होती. शुभेच्छा द्यायला असलेले हितचिंत हातात हात देऊन तर कोणी गळा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत होते. तर, समोर ठेवलेल्या पेटीत दहा रुपयांपासून ते इच्छा आणि ऐपतीप्रमाणे पैसे टाकत होते. दिवसभरात या पेटीत एक लाख २७ हजार ३१० रुपये जमा झाले. यात जमा झालेली सर्व रक्कम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करण्यात येणार असल्याचे नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले. 

संबंधित लेख