No August Pay in Thane MC | Sarkarnama

ऐन गणेशोत्सवात ठाणे महापालिकेत पगाराचे विघ्न!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

महापालिकेकडून महिन्याच्या 1 ते 3 तारखेपर्यंत वेतन होते; परंतु सलग आलेल्या सार्वजनिक सुट्या आणि सप्टेंबर महिन्यात बॅंकांचे क्‍लोजिंग असल्याने वेतन देण्यास विलंब झाला; मात्र आज वेतन देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू होऊन कर्मचाऱ्यांना एसएमएसदेखील गेले आहेत.
-संजय निपाणे, उपायुक्त, महापालिका

ठाणे : मुंबई-पुण्याखालोखाल श्रीमंत गणल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात कौटुंबिक खर्च भागवताना कर्मचाऱ्यांना अनंत विघ्नांना सामोरे जावे लागले आहे. ऑगस्ट महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पालिकेकडून वेळेवर वेतन मिळत नाही. याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तरही दिले जात नाही, अशी माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

ठाणे महापालिकेत सुमारे सात हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन जुलै महिन्यापर्यंत निर्धारित वेळेत होत असे; मात्र नवीन सॉफ्टवेअर असल्याचे सांगून दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडत आहेत. त्याचा परिणाम घराचे हप्ते भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होत आहे. विविध कारणांसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या हप्त्याची तारीख प्रत्येक महिन्याच्या 2 ते 5 तारखेदरम्यान असल्यामुळे हप्ते न भरल्यामुळे बॅंकेकडून दंड आकारण्यात येत आहे.

जुलै महिन्यात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करविभागाकडून समाधानकारक वसुली होत नसल्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवावे, असे आदेश दिले होते; परंतु प्रशासनाने असे न करता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार थांबविल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जुलै महिन्याचे वेतन ऑगस्टमध्ये विलंबाने झाले. तर, आता ऑगस्टचे वेतन रखडल्याने कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.

गणेशोत्सव असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये फेस्टिव्हल अॅडव्हान्स गणेशोत्सवादरम्यान देण्यात आला; मात्र फेस्टिव्हल अॅडव्हान्स दिल्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमची बिले काढली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दर महिन्याच्या 22 तारखेला पदाधिकारी व महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांना जादा कामाच्या वेळेची बिले अदा केली जातात; परंतु फेस्टिव्हल ऍडव्हान्समुळे ही बिलेही रखडली असल्याचे समजते.

 

संबंधित लेख