nivedita mane absent in sharad pawar programme | Sarkarnama

निवेदिता माने रूसल्या, रुकडीत आलेल्या पवारांना त्या भेटायलाही आल्या नाहीत!

सदानंद पाटील 
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

इतकेच नव्हे तर माने यांचे पुत्र धैर्यशील माने व माने गटाच्या कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही.

कोल्हापूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या रुकडी (ता.हातकणंगले) गावी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी भेट दिली. मात्र पत्रिकेत नाव नसल्याने रुसलेल्या माने यांनी चक्‍क या कार्यक्रमाकडेच पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर माने यांचे पुत्र धैर्यशील माने व माने गटाच्या कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. माने गटाच्या या भूमिकेची उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

शनिवारी (ता.24) रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाउराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्राचे उदघाटन  शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. गावातच कार्यक्रम असल्याने व पक्षाचे अध्यक्ष येणार असल्याने निवेदिता माने या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहतील, अशी अटकळ होती. मात्र कार्यक्रमस्थळी खासदार पवार आले तरी निवेदिता माने यांच्यासह त्यांच्या गटाचा एकही कार्यकर्ता फिरकला नाही. कार्यक्रम संपेपर्यंततरी माने या खासदार पवार यांच्या भेटीला येतील अशी आयोजकांना अपेक्षा होती, मात्री ही अपेक्षा साफ फोल ठरली. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवेदिता माने किंवा त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, अशी माने गटाची मागणी आहे. मात्र हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एकमत झाले आहे. येथून स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेटटी निवडणूक लढणार आहेत. कालच खासदार पवार यांनी शेटटींच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आहे. खासदार शेटटी व माने हे कटटर विरोधक आहेत. राष्ट्रवादीकडून शेटटी यांना उमेदवारी दिल्याने माने गटात अस्वस्थता आहे.याची प्रचिती रुकडीतील कार्यक्रमात आली. कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने माने या कार्यक्रमास आले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी हातकणंगलेची उमेदवारीच नाराजीचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख