nititn gadakari talks about mp who threatened to suicide | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

गडकरी कार्यक्रमाला नसतील तर आत्महत्या करेन : एका खासदाराने दिली होती धमकी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 मार्च 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कामाचे प्रगतिपुस्तक एका मुलाखतीत मांडले आणि त्यांच्या कामाची शैलीही उलगडून दाखवली. 

पुणे : केंद्रीय वाहतूक आणि जलसंपदामंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या धडाकेबाज कामांबद्दल प्रसिद्ध आहेतच. पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही एक रेकाॅर्ड मोडले आहे. भाजपच्या खासदारांचा त्यांच्यावर इतका दबाव होता की त्यांना गेल्या आठवड्यात फार पळापळ करावी लागली. त्यातून हे रेकाॅर्ड बनले.

हा विक्रम आहे तो पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा गडकरी यांनी सर्वाधिक भूमिपूजने आणि प्रकल्पांची उद्घाटने करण्याचा. आचारसंहिता लागणयापूर्वीच्या आठवड्यात गडकरी यांनी तब्बल तीन लाख कोटी रूपयांच्या प्रकल्पांसाठी टिकाव खोदला किंवा फित कापलेली आहे. पंतप्रतान मोदींनी उद्घाटन किंवा भूमिपूज केलेल्या प्रकल्पांच्या संख्येपेक्षा आणि त्यांच्या रमकेपेक्षा गडकरींचे कार्यक्रमांचे आकडे जास्त आहेत. 

कार्यक्रमाला गडकरीच हवेत, असा स्थानिक खासदारांचा हट्ट होता. झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याचा निवडणुकीत उपयोग व्हावा, यामुळे खासदारांनी अनेक कार्यक्रम घेतले होते. त्यामुळे गेले आठवडाभर फार पळापळ झाल्याचे गडकरी यांनी एका मुलाखतीत सांगितले. गडकरी आले नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकीही एका खासदाराने दिल्याचे गडकरींनी या मुलाखतीत सांगितले. अर्थात त्या खासदाराचे नाव गडकरी यांनी उघड केले नाही. 

या मुलाखतीत गडकरींचे या लोकसभा निवडणुकीनंतर `प्रमोशन` होईल, अशी अपेक्षा मुलाखतकार आणि पत्रकार संजय पुंगलिया यांनी व्यक्त केली. त्यावर गडकरींनी अशा `प्रमोशन`  ची मला गरज वाटत नाही. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, अशी खात्री व्यक्त केली. भाजपला तीनशेंहून अधिक जागा मिळतील, असाही दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, ``सामाजिक आणि आर्थिक विकासासाठीचे राजकारण करावे,  असे मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपण जनतेच्या उपयोगी पडणे, हेच माझे प्रमोशन आहे. आमच्या खात्याने गंगा स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी 26 हजार कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यातील फक्त तीस टक्के काम झाले आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात गंगा नदी वाहती होती आणि स्वच्छही होती. या कामाबद्दल साधू-भाविकांनी मला आशिर्वाद दिले. हे आशिर्वादच माझे `प्रमोशन` आहे. माझ्या खात्यामार्फत तब्बल बारा ते पंधरा लाख कोटी रूपयांची कामे गेल्या पाच वर्षात सुरू झाली. मुंबई-दिल्ली असा एक लाख कोटी रूपयांच्या एक्स्प्रेस वे चे काम सुरू होणार आहे. हे कामच माझे प्रमोशन आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रमोशनची मला गरज नाही.``

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीतील निकालाच्या हवेचा अंदाज आला असावा, त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, असा टोलाही त्यांनी लगावला. 

महाराष्ट्रातील जायकवाडी धरण यापुढे नेहमी भरलेले राहील, अशा प्रकल्पांच्या कामांना सुरवात होणार आहे. नव्याने होणाऱ्या धरणांना  कालवे नसतील. थेट पाईपद्वारे आणि ठिबकद्वारे शेतात पाणी दिले जाईल. महाराष्ट्रात तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.  

 

 

संबंधित लेख