Nitish Kumar leaves political rivalary aside and Helps Lalu Prasad Yadav's son | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

राजकीय वैर बाजूला ठेवून नितिशकुमारांनी केली लालूप्रसादांच्या मुलाला मदत  

सरकारनामा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

महासंग्रामातही वैयक्तिक नाती कशी जपायची याचा वस्तुपाठ नितिशकुमार यांनी अन्य नेत्यांना घालून दिला आहे. 

पाटणा :  कधीकाळी बिहारच्या राजकारणात परस्परांचे जवळचे सहकारी असलेल्या लालूप्रसाद यादव आणि नितिशकुमार यांच्यात सध्या तीव्र राजकीय मतभेद आहेत. मात्र टोकाचे मतभेद असले तरी दोघांनी परस्परांच्या कुटुंबीयांशी असलेले संबंध चांगले ठेवलेले आहेत. याची प्रचिती नुकतीच एका प्रसंगातून आली आहे.

तेजप्रताप यादव हे लालू प्रसाद यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झालेला आहे. मात्र पत्नीपासून घटस्फोट घेण्याचे जाहीर वक्तव्य केल्याने ते चर्चेत आहेत. लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या घटस्फोटाला विरोध आहे.

त्यामुळे तेजप्रताप यादव संयुक्त घरातून बाहेर पडले आहेत. मध्यंतरी ते हरिद्वारलाही जाऊन आलेले आहेत. आता त्यांच्यासमोर राहायचे कुठे असा प्रश्‍न पडलेला आहे. त्यामुळे तेजप्रताप यादव यांनी बिहार सरकारकडे अर्ज करून नवीन घर मिळावे अशी मागणी केली होती. पण बांधकाम मंत्र्यांनी या अर्जाकडे दुर्लक्ष केले.

त्यावर तेजप्रताप यादव यांनी थेट नितिशकुमार यांना फोन केला आणि राहण्यासाठी घर देण्याचे साकडे त्यांना घातले. "चाचा मुझे घर नही मिलेगा क्‍या?'' अशी विचारणा त्यांनी केली. नीतिशकुमार यांनी पाहतो म्हणून फोन ठेवला. लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्यातील शिक्षा तुरुंगात भोगत आहेत. तेथे नीतिशकुमार यांनी मध्यस्थामार्फत तातडीने  लालूंशी संपर्क साधून काय करू असे विचारले.

त्यावर लालूप्रसाद यादव यांनी स्वतंत्र बंगला द्या, तसे झाले तर नवरा-बायकोतील भांडण कदाचित मिटेल असे सांगत आपली सहमती कळविली.

अखेर नीतिशकुमार यांनी ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी जेथे राहत होते तो बंगला तेजप्रताप यांना राहण्यासाठी दिला आहे. मध्यंतरी नितिशकुमार आणि लालूप्रसाद राजकीयदृष्ट्या एकत्र आले असताना नीतिशकुमार यांच्या मंत्रिमंडळात तेजप्रताप मंत्री होते. नितीशकुमार काही महिन्यापूर्वी तेजप्रतापच्या विवाह सोहळ्यासही हजर  होते.

येत्या लोकसभा निवडणुकीतही लालूप्रसाद आणि नितिशकुमार यांच्यात बिहारमध्ये महासंग्राम होणार आहे. मात्र या महासंग्रामातही वैयक्तिक नाती कशी जपायची याचा वस्तुपाठ नीतिशकुमार यांनी अन्य नेत्यांना घालून दिला आहे. 
 

संबंधित लेख