Nitin Patil doesn't bother to publish senior congress leaders photos on banner | Sarkarnama

नितीन पाटलांच्या वाढदिवस बॅनरवर सत्तार वगळता कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना नाही  स्थान  !

संजय जाधव 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

बॅनरवर कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, नेत्या सोनिया गांधी आणि निवडणुकीचे तिकीट ज्यांच्या हातात आहे ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले नव्हते.

कन्नड :  कॉंग्रेसचे माजी आमदार व येत्या विधानसभेतील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले नितीन पाटील यांचा वाढदिवस नुकताच दणक्‍यात साजरा करण्यात आला. कॉंग्रेसची उमेदवारी आपल्यालाच या आत्मविश्‍वासाने त्यांच्या समर्थकांनी तालुकाभरात शुभेच्छा बॅनर लावले होते.

पण नेमक या बॅनरवर कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, नेत्या सोनिया गांधी आणि निवडणुकीचे तिकीट ज्यांच्या हातात आहे ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले नव्हते. यावरून नितीन पाटलांच्या विरोधकांनी याचा पध्दतशीरपणे अपप्रचार सुरू केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कन्नड तालुक्‍यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे राजीनामा दिलेले विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा केल्यानंतर तर या घडामोडींना अधिक वेग आला आहे. 

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार नितीन पाटील यांनी देखील शड्डू ठोकून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बॅंकेचे संचालक असलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी असलेली जवळीकच त्यांना विधानसभेचे तिकिट मिळवून देण्यास फायदेशीर ठरणार असा कयास पाटील पिता-पुत्राचा झाला आहे. म्हणूनच नितीन पाटील यांच्या वाढदिवस शुभेच्छा बॅनवरवर सत्तार व वगळता कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले नसावे अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे. 

राष्ट्रवादीनेही साधला निशाणा 

तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गट-तट असल्याची चर्चा पक्षाच्या मेळाव्यात झाली. तेव्हा माजी आमदार किशोर पाटील यांनी नितीन पाटील यांच्या बॅनरचा संदर्भ देत कॉंग्रेसवर निशाणा साधला. गट-तट सगळ्याच पक्षात असतात, मी नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे बॅनर पाहिले त्यावर नेत्यांचेच फोटो नाही असे सांगत त्यांनी कॉंग्रेसमधील गट-तट चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. 

आघाडीमध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. पण आघाडी झाली नाही तर किशोर पाटील पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅनरच्या माध्यमातून त्यांनी नितीन पाटील यांच्यावर केलेली टिका महत्वाची मानली जाते. 
 

संबंधित लेख