Nitin Gadkari taking review meetings | Sarkarnama

आल्या निवडणुका : नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

गेल्या 15 दिवसात नितीन गडकरी  दुसऱ्यांदा नागपुरातील अधिकाऱ्यांच्या मॅरॉथॉन बैठका घेऊन विकास प्रकल्पांचे काम कुठपर्यंत आले, याची माहिती जाणून घेत आहेत. 

नागपूर :  लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. गेल्या 15 दिवसात नितीन गडकरी  दुसऱ्यांदा नागपुरातील अधिकाऱ्यांच्या मॅरॉथॉन बैठका घेऊन विकास प्रकल्पांचे काम कुठपर्यंत आले, याची माहिती जाणून घेत आहेत. 

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. नितीन गडकरी यांनी विकास कामावर मते मागितली होती. गडकरींनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली. काही प्रकल्प मात्र अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे त्वरित पूर्ण करावी, यासाठी गडकरी प्रशासनाच्या मागे लागले आहेत. गडकरींनी 15 दिवसांपूर्वीच शहरातील साऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात कामांचा आढावा घेतला होता. ही बैठक जवळपास 5 तास चालली होती. 

केवळ 15 दिवसानंतरच गडकरींनी पुन्हा साऱ्या अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारला महापालिका कार्यालयात बोलाविली आहे. ही बैठक दुपारी 1 वाजता सुरू झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मिहानचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महामेट्रोचे अधिकाऱ्यांसह विकास कामांच्या संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीला पाचारण केले आहे. 

शहरातील सिमेंटचे रस्ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. शहरातील मेट्रो रेल्वेच्या कामामुळे वाहतुकीला मोठ्या अडथळे येत आहे. मेट्रोच्या कामामुळे काही दिवसांपूर्वीच चार तरुणींचा अपघातात मृत्यू झाला. ही कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी गडकरी पाठपुरावा करीत आहे. मेट्रो 2019 पूर्वी सुरूवात होईल, असे आश्‍वासन भाजपने दिले होते. 

या आश्‍वासनाची पूर्ती करण्यासाठी विकास कामांना गती मिळण्याची आवश्‍यकता आहे. मेट्रो रेल्वेचे केवळ तीन स्टेशन तयार झाली आहेत. तेथे पूर्ण व्यवस्था झाली आहे. इतर स्टेशनची कामे प्रगतीपथावरच आहे. शहरात जवळपास 40 स्टेशनची कामे पूर्ण व्हावयाची आहेत. स्टेशनची कामे पूर्ण होईपर्यंत मेट्रो सुरू होऊ शकणार नाही. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सारी कामे पूर्ण करण्यासाठी नितीन गडकरी आग्रही आहेत.
 

संबंधित लेख