गोव्यातील यशाने गडकरींचे वजन वाढले ... 

गोव्यातील यशाने गडकरींचे वजन वाढले ... 

मुंबई ः गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सत्तेची गणिते जुळविण्यामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीनंतर, महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणातही गडकरी यांचे वजन वाढले असून, गुरुवारी विधीमंडळाजवळील नरिमन पॉंईट येथील शिपींग कॉपोरेशनच्या कार्यालयात गडकरी यांना भेटण्यासाठी अनेक सनदी अधिकारी आणि भाजपचे मंत्री आणि आमदारांनी गर्दी केली होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिर असल्याचे सांगून गडकरी यांनी राज्यात लगेच नेतृत्वबदल होणार नसल्याचे संकेत दिले असले तरी, गोव्यात पर्रीकर विराजमान झाल्याने, संघ परिवाराच्या गुडबुक मध्ये असलेले गडकरी पुन्हा पॉवरबाज झाल्याचे दिसून येत आहे. 

गोवा राज्यात भाजपला कॉंग्रेसपेक्षा कमी जागा असताना, नितीन गडकरी यांनी सत्तास्थापनेसाठी विविध पक्षातील आमदारांना भाजपसोबत आणण्यात यश मिळविले. जुन्या संबंधाचा फायदा घेत बोलणी केली. गोवा राज्यासाठी केंद्र सरकारकडून हवी असलेली मदत आणि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतील तर, भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दिसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सल्लामसलत करुन भाजपची गोवा सत्ता आणण्याबाबत प्रयत्न केले, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

कॉंग्रेसच्या संख्याबळापेक्षा भाजपचे संख्याबळ कमी असताना, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मनोहर पर्रीकर यांच्याबाजूने बहुमत सिद्ध करण्यासाठी गडकरी यांचीच व्यूहरचना असल्याचे पुढे आले आहे. भाजपचे केवळ 13 आमदार असताना छोटया पक्षांच्या मदतीने भाजपने गुरुवारी विश्‍वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाज गुरुवारी दुपारी संपल्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी शिपींग कॉर्पोरेशनच्या कार्यालयात जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. 

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळत आहे, असे वृत्त आहे. यावर गडकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दाखवली आहे. त्यामुळे, त्यांच्या नेतृत्वामध्ये बदल करण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. विधिमंडळाला लागून असलेल्या शिपींग कॉपोरेशनच्या इमारतीत गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, विविध बैठकांना घेतल्या होत्या. त्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लगबगीने एरव्ही शांत असलेले शिंपींग कार्पोरेशनाला गडकरींच्या भेटीमुळे आज काही काळ मिनी मंत्रालयाचे स्वरूप आले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com