nitin gadakari and diwali | Sarkarnama

अनाथांच्या आयुष्यात गडकरींनी आणला " आनंद - प्रकाश ' 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

दिवाळीत अनाथालयातील मुलांसोबत काही क्षण घालवावे व त्यांनाही आपल्या पाठीमागे कुणीतरी आहे, याची जाणीव द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला. नितीन गडकरींनी आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना केला. नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या धापेवाडा येथील हे कुटुंब. आता केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही गडकरींनी भूतकाळातील त्या परिस्थितीचा विसर पडू दिलेला नाही. 

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नव्या "भक्ती' बंगल्यात दिवाळीच्या दिवशी बालगोपाशांची गर्दी झाली होती. शहरातील अनाथालयातील शंभरवर मुलांना गडकरींनी खास निमंत्रण दिले होते. उपेक्षेचे जीवन जगणाऱ्या या बालकांच्या गालावर फुललेले हास्याने यावेळी उपस्थित असलेल्यांना एक समाधान लाभले. 
जवळपास शंभरावर मुलांना दिवाळीत नितीन गडकरी यांच्या रामनगरातील नव्या भक्ती बंगल्यात बोलाविण्यात आले. 

दिवाळीत अनाथालयातील मुलांसोबत काही क्षण घालवावे व त्यांनाही आपल्या पाठीमागे कुणीतरी आहे, याची जाणीव द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला. नितीन गडकरींनी आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना केला. नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या धापेवाडा येथील हे कुटुंब. आता केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही गडकरींनी भूतकाळातील त्या परिस्थितीचा विसर पडू दिलेला नाही. 

भक्ती बंगल्यात या मुलांनी केवळ गोडधोड खाल्ले नाही तर या मुलांना शहरातील मॉलमध्ये नेण्यात आले. मॉलमध्ये या मुलांना खरेदीची छानशी संधी देण्यात आली. "तुम्हाला जे पाहिजे, ते खरेदी करा', असे त्यांना सांगण्यात आले. अनेक मुलांनी तर पहिल्यांदाच अशाप्रकारच्या मॉलमध्ये प्रवेश केला होता. मॉलमधील चकचकीतपणाने अवाक झालेल्या मुलांनी काही खरेदी केली. या खरेदीची संपूर्ण रक्कम गडकरी यांनी अदा केली. या मुलांना भेटवस्तू देण्यात आली. 

या उपक्रमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा संदेश प्रत्यक्षात उतरविला. यासाठी भारत विकास परिषदेने पुढाकार घेतला होता. मुलांना कपडे, मिठाई, आकाशदिवे, फुलझडी व अनाथालयात 20 दिवसांचा संपूर्ण धान्यसाठा देण्यात आला. आयुष्यभर राजकारणात राहणारे नितीन गडकरीही या मुलांसोबत बोलताना भावूक झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, गरीब मुलांच्या भावना समजून घेताना आनंद होतो. हा आनंद ईश्‍वरसेवापेक्षाही मोठा आहे. दिवाळी हा समाजातील लोकांना जोडणारा व एकमेकांचे सुखदुःखात सहभागी होण्याचा हा सण असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी या सर्व चिमुकल्यांना भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व मुलांना हा एक अविस्मरणीय क्षण होता. 
 
संबंधित लेख