nitesh rane, maratha morcha, mumbai | Sarkarnama

संतप्त मराठा मोर्चेकऱ्यांची नितेश राणे यांना धक्काबुक्की

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्याला स्थान द्यायचे नाही, असा संकेत होता. मात्र मुंबईतील मोर्चात खासदार संभाजीराजे आणि आमदार नितेश राणे हे व्यासपीठावर आले आणि त्यांनी भाषणही केले. ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली.

मुंबई : आपण मराठा समाजाचा आमदार असल्याने मोर्चेकरी आपल्याला स्वीकारतील असे मानणाऱ्या कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांच्यावर आझाद मैदानात संतप्त मराठा मोर्चेकऱ्यांनी घेरावो घालतानाच रोखले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि माथाडी नेते नरेंद्र पाटीलही होते. धक्काबुक्कीमुळे नरेंद्र पाटील हे दोनवेळा पडले. हा सर्व धक्कादायक प्रकार आज लाखो मोर्चेकरांसमोर घडला. 

आझाद मैदानात भगवे वादळ दाखल झाल्यानंतर मोर्चातर्फे एक निवदेन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी शिष्टमंडळ गेले. या शिष्टमंडळात पाच मुलींचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन परतल्यानंतर या पाच मुली पुन्हा मोर्चाला सामोऱ्या गेल्या. मुख्यमंत्र्यांनी कोणते आश्‍वासन दिले याची माहिती या पाच मुलीनीच द्यावी असा आग्रह संतप्त मोर्चेकरांनी धरला. या मुली व्यासपीठावर आल्यानंतर खासदार संभाजीराजे आणि नितेश राणे यांना व्यासपीठावर बोलावताच मोर्चेकऱ्यांचा गोंधळ सुरू झाला. 

संभाजीराजे यांचे दोन मिनिट भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात राणे यांचा उल्लेख केला. टिव्हीचे कॅमेरे त्यांच्यावर फिरले. संभाजीराजे हे कोणतीही घोषणा न करता दोन मिनिटांनंतर व्यासपीठावरून खाली उतरले.

नितेश राणे यांनीही व्यासपीठावरून विचार मांडताना मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे सांगितले. परंतु जमावातून लेखी आश्वासन दिले का, असा बुलंद आवाज घुमला. त्यानंतर नितेश राणे व्यासपीठावरून खाली उतरताना त्यांना संतप्त मराठा मोर्चेकरांनी घेराव घातला. आताच असेच आमच्या बरोबर चालत विधान मंडळात चला असा आग्रह मोर्चेकरांनी धरला. यावेळी राणे यांच्यासोबत माथाडी नेते नरेंद्र पाटील उपस्थित होते. धक्काबुक्कीमुळे पाटील हे दोन वेळा खाली पडले. संतप्त मोर्चेकरांनी घेराओ घातल्याने काही वेळासाठी वातावरण तंग झाले होते. संयोजकांनी नितेश राणे यांना संतप्त जमावातून बाहेर काढत रस्ता करून दिला. राणे यांना रोखणाऱ्या आठ ते दहा मार्चेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  
 

संबंधित बातम्या

तीन लाख मराठा मुलांचे होणार स्किल डेव्हलपमेंट : मुख्यमंत्री
विनाकारण आमची माथी भडकवू नका  
तावडे, तुम्ही कॅबिनेटमध्ये झोपा काढता का? 
`आशिष शेलारांची मराठा मोर्चात चमकोगिरी' 
मराठा समाजाने कायम औदार्य दाखवले; आता तुम्ही दाखवा 

संबंधित लेख