nirmala sitharaman | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

घराबरोबरच आता देशाचं संरक्षणही "तिच्या' हाती...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 सप्टेंबर 2017

देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर त्यांनी कंपनी अफेअर्स आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काही काळ काम केलं. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योग खात्याचा कार्यभार सांभाळला. या दोन खात्याबद्दल कुणाला फारशी तक्रारीची संधी न देता त्यांनी मोदी यांचा विश्‍वास तर मिळवलाच पण दिल्लीच्या वर्तुळात आपल्या कामाचा ठसाही उमटवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या राजकीय आणि संसदीय कारकीर्दीत धक्का तंत्राचा वापर करण्यात अत्यंत कुशल आहेत. यावेळीही मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांनी संरक्षण खाते कुणाकडे सोपवणार याबद्दल कुणाला काही कल्पना येऊ दिली नव्हती. त्यामुळे खातेवाटपानंतर त्यांनी सगळ्यांना सुखद धक्का दिला तो संरक्षणासारखं महत्वाचे खाते एका महिलेकडे सोपवून. आजपर्यंत महिलांनी सर्वच क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. सेनादलाच्या तिन्ही विभागात महिलांना प्रवेश देऊनही आता बराच काळ लोटला आहे. पण निर्मला सीतारामन यांना संरक्षणखात्याचा कार्यभार देऊन मोदी यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कामाला पावतीच दिली आहे. 
मध्यंतरी जेव्हा भारतीय महिला हॉकी संघाने परदेशात पराक्रम गाजवला तेव्हा फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप वर आता घराबरोबर खेळातही देशाची मान उंचावण्याची जबाबदारी महिलांवर येऊन पडली आहे अशा कॉमेंटस्‌ असणाऱ्या पोस्ट सगळीकडे फिरत होत्या. आता सीतारामन यांच्यावरील नव्या जबाबदारीने घराबरोबर देशाच्या संरक्षणाचीही जबाबदारी महिलांवर येऊन पडली अशी पोस्ट आल्या तर नवल नाही, पण निर्मला सीतारामन यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या बळावर आणि मोदी यांच्या कामाचा जो झपाटा आहे त्याच्याशी सुसंगत काम करण्याच्या बळावर हे महत्वाचे पद मिळवले आहे. 

देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर त्यांनी कंपनी अफेअर्स आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काही काळ काम केलं. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योग खात्याचा कार्यभार सांभाळला. या दोन खात्याबद्दल कुणाला फारशी तक्रारीची संधी न देता त्यांनी मोदी यांचा विश्‍वास तर मिळवलाच पण दिल्लीच्या वर्तुळात आपल्या कामाचा ठसाही उमटवला. तामिळनाडू मधल्या मदुराई शहरात त्यांचा जन्म झाला. आज अठ्ठावन्नावर्षी त्यांनी हे जे पद मिळवले आहे त्यामुळे पक्षातले ज्येष्ठ नेतेही चकीत झाले असतील. ज्या सुषमा स्वराज्य यांच्यामुळे त्या भारतीय जनता पक्षात आल्या आणि पक्षात वेगाने काम करू लागल्या त्यांच्याबरोबरच मोठे काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आज सुषमा स्वराज्य परराष्ट्रमंत्री आणि निर्मला सीतारामन संरक्षणमंत्री आहेत. दोन्ही खात्यामध्ये समन्वय असायाला लागतो आणि तो या दोघींमध्ये राहिल यात शंका नाही 

तिरुचिरापल्ली येथून बीए झाल्यावर त्या अर्थशास्त्रात एम ए करण्यासाठी दिल्लीतल्या जेएनयू मध्ये दाखल झाल्या, तिथे शिक्षण घेऊन त्यांनी पुढे डॉक्‍टरेटही केली. जेएनयूच्या वास्तव्यातच त्यांचा विवाह आंध्र प्रदेशातले डॉ. पी. प्रभाकर यांच्याशी झाला. पुढे दोघेही परदेशात गेले. 1991 मध्ये ते इंग्लंडमधून भारतात परत आले. हे दोघेही हैदराबाद येथे स्थायिक झाले. प्रणव स्कूलची स्थापना करण्यात सीतापमन यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय महिला आयोगावर काम करताना त्यांचा संबंध स्वराज्य यांच्याशी आला. 2006 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले आणि 2010 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्याच्या मंडळात निवड झाली. सीतारामन यांच्या कारकीर्दीला वळण देणारा हा महत्वाचा टप्पा होता. मग मात्र सीतारामन यांनी मागे वळून पाहिले नाही. विविध वाहिन्यांवर पक्षांची बाजू समर्थपणे मांडतान त्यांनी आपल्याबद्दल एक आश्‍वासक वातावरण तयार करण्यात यश मिळवले. मोदी सरकारमध्ये समावेश झाल्यावर झपाटून कामही केले आणि आज हे मोठे पद मिळवले. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे संरक्षणखाते होते. पण पंतप्रधानपद आणि संरक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार असे त्याचे स्वनरुप होते. देशाला प्रथमच पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

प्राईमवॉटरहाऊस या कंपनीत सीनीयर मॅनेजर म्हणून काम केलेल्या निर्मला सीतारमन यांना या महत्वाच्या खात्यावर आता आपला ठसा उमटावयाचा आहे. या खात्याचे आव्हान त्या कसे पेलतात याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. 

संबंधित लेख