Nipun Vinayak tells workers not to give money for getting a permanent job | Sarkarnama

निपुण विनायक सफाई कामगारांना  म्हणाले : तुम्ही सेवेत पर्मनंट  व्हाल, पण कुणाला पैसे देऊ नका    

जगदीश पानसरे 
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

यावेळी आयुक्तांनी त्यांना "तुम्ही कायम व्हालच, पण मी तुमचे काम करुन देतो म्हणून जर तुम्हाला कुणी पैसे मागत असलेत तर अजिबता देऊ नका ,'असा सावधानतेचा इशारा  निपुण यांनी  दिला.

औरंगाबादः दिवाळी असो की दसरा, रमजान असो की ख्रिसमस नेहमीच कामासाठी तत्पर असलेल्या पाणी पुरवठा विभागाचे लाईनमन, सफाई कामगार हे महापालिकेचा कणा समजले जातात.

हे महत्व ओळखूनच महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आज पहाटेच सफाई कामगार व लाईमन सोबत दिवाळी साजरी केली. वार्डावार्डात जाऊन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या, त्यांनी मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

शहरातील कचरा आणि पाण्याचा प्रश्‍नावरून नागरिकांची लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या प्रशासनावर देखील नाराजी आहे. स्वच्छता अभियानात भरीव कामगिरी करणारे डॉ. निपुण विनायक यांना थेट दिल्लीहून शहरातील कचरा प्रश्‍न सोडवण्यासाठी पाचारण करण्यात आले. 

पाण्याची गळती, जायकवाडीतून पुर्णक्षमतेने पाणी उपसा करू न शकणारी यंत्रणा या सगळ्या गोष्टींमुळे देखील शहवासियांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड होत असते. पण या सगळ्यात पहाटेपासून गल्लीबोळात फिरून पाणी पुरवठा करणारे लाईनमन, साफसफाई करणारे कर्मचारी यांचा काय दोष? असा प्रश्‍न देखील उपस्थित केला जातो. 

महापालिका आयुक्तांना देखील याची जाणीव असल्यामुळेच आज (ता. 7) त्यांनी या सगळ्यांसाबेत सहकुटुंब दिवाळी साजरी करत शुभेच्छा दिल्या. थेट कामाच्या ठिकाणी येऊन महापालिका आयुक्तांनी स्वःत शुभेच्छा दिल्यामुळे कर्मचारी भारावले होते.

अनेकांनी "साहेब मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे," असा आग्रह धरला तेव्हा निपुण यांनी देखील त्यांच्यासोबत आनंदाने सेल्फी काढला. 

ऐरवी आयुक्तांना भेटून आपले गाऱ्हाणे मांडण्याची संधी तशी दुर्मिळच. पण दिवाली निमित्त थेट आयुक्तच सफाई कामगारांपर्यंत पोचल्याने अनेकांनी त्यांना "आम्हाला  पर्मनंट  कधी करणार साहेब?" असा प्रश्‍न केला.

यावेळी आयुक्तांनी त्यांना "तुम्ही कायम व्हालच, पण मी तुमचे काम करुन देतो म्हणून जर तुम्हाला कुणी पैसे मागत असलेत तर अजिबता देऊ नका ,'असा सावधानतेचा इशारा देखील काळजीपोटी दिला. नियमानुसार तुमचे हक्क मिळतील असे आश्‍वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख