nipun top gear and aurangabad | Sarkarnama

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कारभारात निपुण यांचा " टॉप गिअर '

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : मालमत्ता करवसुली अभियान मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आपल्यातील खमक्‍या प्रशासकाची झलक दाखवून दिली. गेल्या आठवड्यात संजय जक्कल तर आज तौसिफ अहेमद या वसुली अधिकाऱ्याला निलंबित करत कामात हलगर्जीपणा कदापी खपवून घेतला जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांना दिला आहे. 

औरंगाबाद : मालमत्ता करवसुली अभियान मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आपल्यातील खमक्‍या प्रशासकाची झलक दाखवून दिली. गेल्या आठवड्यात संजय जक्कल तर आज तौसिफ अहेमद या वसुली अधिकाऱ्याला निलंबित करत कामात हलगर्जीपणा कदापी खपवून घेतला जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांना दिला आहे. 

महापालिका कार्यालयात दलालांचा अधिक वावर असतो म्हणून मी कार्यालयात बसत नाही असे वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खऱ्या अर्थाने आता "टॉपगेअर' टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर निपुण यांनी पाच-सहा महिन्यांनी हाती हंटर घेतल्याचे त्यांनी केलेल्या कारवाईवरून दिसून आले आहे. 

औरंगाबाद शहराताली कचराकोंडी फोडण्यासाठी प्रामुख्याने निपुण यांची थेट दिल्लीहून महापालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. केंद्रात स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवल्यामुळे ते औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्‍न चुटकीसरसी सोडवतील असे वाटले होते, पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे होते. सत्ताधारी पक्षातील आपापसातील मतभेद, हेवेदावे, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा दबाव, कंत्राटदारांचे लोकप्रतिनिधींशी असलेले लागेबांधे या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे निपुण यांनी महापालिकेत जास्तवेळ न थांबणेच पसंत केले होते. नागरिक व लोकप्रतिनिधींना थेट अंगावर न घेता निपुण यांनी शहरातील प्रश्‍न आणि समस्या सोडवण्यासाठी ट्विटर माध्यमाचा वापर सुरू केला. 

हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही, त्यांच्यावर दबक्‍या आवाजात टिका सुरू झाली. कचरा, पाणी, रस्ते, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना हे सगळेच प्रश्‍न जैसे थे होते. कचरा प्रश्‍न सोडवण्यात निष्नात म्हणून निपुण यांना पाचारण करण्यात आले होते, तो कचऱ्याचा प्रश्‍न देखील कायम होता. त्यामुळे महापालिका आयुक्त यांच्याविरोधात एक जनमत तयार होऊ लागले होते. अशातच महापालिकेत दलालांचा अधिक वावर असल्यामुळेच मी कार्यालयात बसत नाही असे हतबल उदगार निपुण यांनी काढले. यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टिका देखील सुरू झाली. महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्याची जबाबदारी असलेले आयुक्तच अशी भाषा करत असतील तर नागरिकांनी कुणाकडे पहायचे असा सूर लोकांमधून उमटायला सुरुवात झाली. 

उगारला शिस्तीचा बडगा 
औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थीती बिकट आहे. केवळ राज्य आणि केंद्राकडून मिळणाऱ्या निधीवरच महापालिकेचा कारभार सुरू असल्याचे बोलले जाते. करवसुलीच्या बाबतीत महापालिकेची पाटी सुरूवातीपासूनच कोरी राहिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेने साडेचारशे कोटींचे करवसुली उदिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष संपायला चार महिने शिल्लक असतांना आजच्या घडीला केवळ 67 कोटींची वसुलीच महापालिकेला करता आली आहे. 

कासवालाही लाजवेल अशीही वसुलीची गती असल्यामुळे यावर लक्ष केंद्रीत करण्यावर महापौर व आयुक्तांचे एकमत झाले होते. दिवाळी संपताच करवसुलीसाठी विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय दोघांनीही घेतला होता. मोठ्या थकबाकीदारांकडे स्वःत महापौर, आयुक्त गेले. आठवडाभराच्या मोहिमेतून 50-60 कोटींचा करवसुल करण्याचे लक्ष्य पथकाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात दहा कोटींचीच वसुली होऊ शकली. 

करवसुलीची मोहिम फसल्याची टिका होऊ लागल्याने महापालिका आयुक्तांनी झारीतील शुक्राचार्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. विशेष वसुली अधिकारी संजय जक्कल यांना वारंवार नोटीसा बजावून देखील त्यांच्या कामात सुधारणा न झाल्यामुळे निपुण यांनी जक्कल यांना थेट निलंबित केले. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या प्रमाणे इतर वसुली अधिकारी बोध घेतली ही अपेक्षाही फोल ठरली. त्यामुळे निपुण यांच्या कारवाईचा दुसरा बडगा उगारला गेला तो महापालिकेती जनसंपर्क अधिकारी व विशेष वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या तौसिफ अहेमद यांच्यावर. त्यांनाही नोटीस बजावून समज देण्यात आली होती, पण त्याने न भागल्यामुळे निपूण यांनी काल रात्री उशीरा त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. 

यापुर्वी जून महिन्यात नाल्यावरील अतिक्रमण वेळेत हटवले नाही, त्यामुळे एका नागरिकांचा जीव गेल्याच्या कारणावरून निपुण यांनी उपायुक्त रविंद्र निकम यांना निलंबित केले होते. तर प्राणी संग्रहालयाचे संचालक तथा मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी.एस. नाईकवाडे यांना देखील अकार्यक्षम ठरवून निपुण यांनी निलंबित केले होते. महापालिका आयुक्त निपुण यांनी अचानक आक्रमक पावित्रा घेतल्याने महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख