Niphad Bandh against Migration of Tehsil office | Sarkarnama

तहसीलदार कार्यालयाच्या नथीतून विरोधकांचे शिवसेना आमदार अनिल कदमांवर बाण! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

शहरातील तहसीलदार कार्यालय स्थलांतरांचा प्रश्‍न यापूर्वी 2016 मध्ये निर्माण झाला. कार्यालय शहरापासून दूर रसलपूर परिसरात स्थलांतरीत होणार आहे. त्याला तेव्हाही नागरीकांनी प्रखर विरोध केल्याने स्थलांतर थांबले होते. आता पुन्हा स्थलातराचा विषय पुढे आला. त्यामुळे या विषयावर नागरीक, व्यापारी, शेतकरी सगळेच विरोधासाठी एकत्र आले.

निफाड : येथील तहसिलदार कार्यालयाचे स्थलांतर हा आमदार अनिल कदम यांनी प्रतिष्ठेचा विषय केला आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी उपोषण केले. त्याला सर्वपक्षीय, व्यावसायिक, संघटनांनी पाठींबा देत रास्ता रोको, बंद पुकारला. त्यामुळे निफाडचे राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या विरोधात विरोधकांची मोट बांधली गेली आहे.

शहरातील तहसीलदार कार्यालय स्थलांतरांचा प्रश्‍न यापूर्वी 2016 मध्ये निर्माण झाला. कार्यालय शहरापासून दूर रसलपूर परिसरात स्थलांतरीत होणार आहे. त्याला तेव्हाही नागरीकांनी प्रखर विरोध केल्याने स्थलांतर थांबले होते. आता पुन्हा स्थलातराचा विषय पुढे आला. त्यामुळे या विषयावर नागरीक, व्यापारी, शेतकरी सगळेच विरोधासाठी एकत्र आले. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कुंदे यांनी उपोषण सुरु केले. शहरात कडकडीत बंद पाळत रास्ता रोको झाला. तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजेंद्र डोखळे, भाजपचे राजाभाऊ शेलार, कॉंग्रेसचे मोहन शेलार, बापुसाहेब कुंदे, सुभाष कराड आदी सर्वच नेते एकत्र आले. 

शहरातील बापुसाहेब कुंदे, निफाड वकिल संघातर्फे अध्यक्ष अॅड. जी एन शिंदे, निफाड डॉक्‍टर्स असोसिएशनचे डॉ नारायण लोखंडे, निफाड सराफ असोसिएशनचे विनीत आहेर अशा विविध दहा ते बारा संघटनांनी आमदार कदम यांच्या निर्णयाविरोधात एकजुट निर्माण केली. त्याचा संबंध येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील राजकारणाशी जोडला जाऊ लागला आहे. शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्ष व नेते यात एकत्र आल्याने आमदार कदम अस्वस्थ झाले आहेत. शिवसेना विरुध्द सर्व अशा स्थितीने राजकारण आणखी काही दिवस तापत राहण्याची चिन्हे आहेत. 

निफाडचे तहसील कार्यालय स्थलांतरास नागरिकांच्या विरोधाची तीव्र भावना आहे याबाबत शासनाला माहिती पोहोचवू 
- दीपक पाटील, तहसिलदार, निफाड. 

संबंधित लेख