nilesh rane targets bhaskar jadhav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

भास्कर जाधवांची टीका नाही रूचली; निलेश राणेंची जीभ सैल सुटली

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

राजकीय नेत्यांतील संघर्षात एकमेकांवर टीका करताना किती खालची पातळी गाठावी, हे माजी खासदार निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे. टीकाटिप्पणी जरून व्हावी पण त्यासाठी व्यंगाचा आणि आजारपणाचा वापर करावा, हे रूचत नाही. आक्रमकपणा म्हणजे खालच्या पातळीवरील टीका करणे नाही, हे या डाॅक्टर नेत्यांना केव्हा समजेेल?

पुणे : माजी खासदार डाॅ. निलेश राणे सध्या चिडले आहेत. त्याला कारणही तसेच घडले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊन आणि माजी मंत्री भास्कर जाधव या दोघांनी गप्पा मारत असताना निलेश राणे यांना कसे पाडले, याचा उलगडा केला. तसेच आगामी निवडणुकीत निलेश हे जर उभे राहणार असतील तर तुम्ही प्रचार नाही केला तरी निवडून याल, असा टोमणा जाधव यांनी राऊत यांच्याकडे मारला. त्यामुळे निलेश यांच्या संतापात भर पडली.

जाधव यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते सध्या घरीच आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राज्यातील अनेक नेते येऊन गेेले. राऊत यांनीही त्यांची भेट घेतली. साहजिकच दोघांच्या राजकीय गप्पा कार्यकर्त्यांसमोर रंगल्या. जाधव यांनी २०१४ च्या निवडणुकीत मदत केल्याची आठवण राऊत यांनी या वेळी काढली. जाधव यांनीच मदत केल्याने राऊत हे राणे यांच्याविरोधात निवडून आल्याचे हे यानिमित्ताने जाहीर झाले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची आघाडी होती. या निवडणुकीत निलेश राणे हे आघाडीचे उमेदवार होते. तरीही जाधव यांनी राऊत यांना मदत केल्याची तक्रार राणे यांनी तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे केली. राष्ट्रवादीने हा आरोप फेटाळला होता. राऊत आणि जाधव यांच्या गप्पांतून राणे यांच्या आरोपाला पृष्टी मिळाल्याचे जाहीर झाले. आगामी निवडणुकीत भाजपकडून सुरेश प्रभू हे जर रत्नागिरीतून उमेदवार असतील तर राऊत यांना जोरदार तयारी करावी लागेल, असा सल्ला जाधव यांनी दिला. तसेच निलेश राणे हे जर रिंगणात असतील तर तुम्ही घरी बसून निवडून याल, असाही दिलासा दिला.

या गप्पांचे वृत्त `सरकारनामा`त प्रसिद्ध झाल्यानंतर निलेश राणे यांनी ते आपल्या प्रतिक्रियेसह ट्विट केले. त्यात मात्र त्यांची भाषा ही एखाद्या नेत्याला शोभेल अशी नव्हती. त्यांनी जाधव यांना लंगड्या म्हणून तर राऊत यांना वाकड्या तोंडाचा अशी टीका केली. हे दोघेही २०१४ च्या स्वप्नात असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. २०१९ चा निकाल बदललेला असेल, असेही आव्हान त्यांनी दिले. निलेश राणे हे माजी खासदार असूनही त्यांनी अशा खालच्या पातळीवर टीका करणे अनेकांना रूचले नाही.

`वाळू चोर तो वाळू चोरच राहणार. ह्यांनी विरोधकांचीच भांडी घासली आणि स्वकीयांचा घात केला. मला कळत नाही पवार साहेबांवर अनेक वेळा शस्त्रक्रिया झाल्या. पण त्यांनी कधी आराम केला नाही आणि हा फक्त फुटेज खाण्यासाठी बराच होत नाही आहे,` असाही टोला त्यांनी जाधवांना लगावला आहे. 

  

संबंधित लेख