निलंगेकर रमेशअप्पांना म्हणाले... झालं गेलं, गंगेला मिळालं !

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोमवारी (ता. तीन) मतदारसंघातील रेणापूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अप्पांच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब केले. निलंगेकर अप्पांना म्हणालेही .. झालं गेलं, गंगेला मिळालं !
nilangekar-karad-1
nilangekar-karad-1

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग दोन वेळा भाजपची खिंड लढवणारे तसेच या मतदारसंघात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणाऱ्या रमेशअप्पा कराड यांचे भाजपमध्ये पुनर्वसन झाले आहे. लातूर - बीड - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील बंडानंतर भाजपापासून दूर गेलेले अप्पा आता पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आहेत. 

पक्षाच्या काही दिवसाच्या सहवासानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोमवारी (ता. तीन) मतदारसंघातील रेणापूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अप्पांच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब केले. निलंगेकर अप्पांना म्हणालेही .. झालं गेलं, गंगेला मिळालं !

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अप्पांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपला चांगले दिवस आणले. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात भाजपची फळी मजबूत  केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारसंघात मिळालेल्या यशामुळे त्यांनी पक्षासाठी केलेल्या कष्टाचे चीज झाले. जिल्हा बॅंक व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळाले. 

स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांत भाजपचे स्थान पक्के करण्यात त्यांना यश आले. मात्र, 2018 वर्षात त्यांना पक्षांतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले. वर्चस्वाच्या लढाईत त्यांची पक्षात घुसमट होऊ लागली. पक्ष संघटनेत त्यांच्या समर्थकांना डावलले जाऊ लागले. लातूर - बीड - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत संधी साधून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीही मिळवली. मात्र, चारच दिवसात त्यांनी उमेदवारी मागे घेऊन राजकीय क्षेत्राला हादरा दिला. त्या वेळी त्यांच्या कृतीची मोठी चर्चा घडून आली.

 ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी असलेले भावाचे नातेही चर्चेत आले. आता कोणाला भाऊ माननार नाही, असे श्रीमती मुंडे त्राग्याने म्हणाल्या होत्या. अप्पांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची टीका झाली. काही दिवस चाललेल्या चर्चेमुळे बॅकफुटवर आलेल्या रमेशअप्पांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली. मात्र, भाजपची साथ सोडली नाही. भाजपमध्ये एक पाय ठेऊनच राष्ट्रवादीत गेल्याचे ते सांगत होते. विविध घटना, प्रसंग व कार्यक्रमांतून भाजपमध्येच असल्याचे दाखवत होते. रेणापूर तालुकाध्यक्षांच्या निवडीतून त्यांनी मतदारसंघातील भाजपवर स्वतःची पकड असल्याचे दाखवून दिले.  

बंडाचे वातावरण थंड होताच त्यांचा पुन्हा पक्षाच्या कार्यक्रमात नकळत सहभाग वाढला. मागील काही दिवसात सहभाग वाढत गेला आणि सोमवारच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यातून त्यांनी मतदारसंघात नव्या दमाने व उमेदीने तयारी सुरू केलेल्या तयारीला पालकमंत्री निलंगेकर यांनीही जाहिर पाठिंबा दिला. दोघांत कसलेच मतभेद नसल्याचे सांगताना रमेशअप्पांची घरवापसी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यातील बोलणीनुसार झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

झालं गेलं गंगेला मिळाल्याचे सांगून मागील काळातील घटना विसरून जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यामुळे पक्षातील राजकीय प्रवासाची अप्पांची वाट आता मोकळी झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे. दरम्यान अप्पांच्या संक्रमणाच्या काळात त्यांना सोडून दुसऱ्या गटात सामील झालेल्या काही कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com