On that night I was awake until last soldier returned : Narendra Modi | Sarkarnama

सर्जिकल स्ट्राईकसाठी गेलेले सर्व जवान सुखरूप परत येईपर्यंत मी रात्र जागून काढली : नरेंद्र मोदी 

सरकारनामा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

सकाळी तासाभरासाठी सीमेपलीकडून माहितीच येणे बंद झाल्यावर माझी चिंता आणखी वाढली होती. सूर्योदयानंतरचाही एक तास माझ्यासाठी चिंतेचाच होता.

-नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक बाबत प्रारंभी मी किंवा कोणीही मंत्री बोलले नाहीत . लष्कराच्या प्रवक्त्यानेच याबाबत माहिती दिली होती . पण आपल्या देशातील काही विरोधी पक्षांनी पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून या ऑपरेशनबाबत शंका उपस्थित केल्या . आपल्या जवानांनी प्राणाची बाजी  लावून हे ऑपरेशन यशस्वी केले पण त्याबाबत शंका उपस्थित करणे अयोग्य होते ," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत  सांगितले . 

पाकिस्तानात जाऊन अतिरेक्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक भारतीय जवानांनी केला . या विषयाचे राजकारण व्हावलाच नको होते असे माझे मत आहे पण काँग्रेसने संशयाचे वातावरण निर्माण करीत राजकारण केले . हे राजकारण आम्हाला मान्य नव्हते , असे श्री . नरेंद्र मोदी म्हणाले . 

लष्कराच्या 'सर्जिकल स्ट्राइक'बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले , "प्रत्यक्ष मोहीम सुरू असताना मी चिंताक्रांत होतो, या मोहिमेमध्ये यश अपयशाचा विचार करू नका; पण सूर्योदय होण्यापूर्वी भारतात या, असे आदेश मी लष्कराला दिले होते. कोणत्याही परिस्थितीत  मोहीम सूर्योदयानंतर लांबवू नका, असेही मी त्यांना बजावले होते. ही सर्वांत मोठी जोखीम असल्याचे मला माहिती होते, सैनिकांची सुरक्षितता हाच माझ्यासाठी चिंतेचा विषय होता. "

" सकाळी तासाभरासाठी सीमे पलीकडून माहितीच येणे बंद झाल्यावर माझी चिंता आणखी वाढली होती. सूर्योदयानंतरचाही एक तास माझ्यासाठी चिंतेचाच होता. अखेर दोन ते तीन तुकड्या सुरक्षित पोचल्याचे मला सांगण्यात आले, तसेच काळजी करू नका, असाही सल्ला देण्यात आला होता. यावर मीही शेवटचा माणूस सुखरूप येत नाही तोवर मला हायसे वाटणार नाही, असे सांगितले. ती  रात्र मी जागून काढली '' , असेही नरेंद्र मोदी म्हणाले . 

राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे जामिनावर बाहेर असलेले नेते आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली . त्यांनी नोटबंदी वर सविस्तर भाष्य केले . राफेल घोटाळ्याबाबत माझ्या विरुद्ध पुरावे द्या असे आव्हान त्यांनी राहुल गांधी यांना दिले . 

संबंधित लेख