शेट्टी-जयंतरावाचं जमलं फिट सायकलवर बसले डबलशीट...

शेट्टी-जयंतरावाचं जमलं फिट सायकलवर बसले डबलशीट...

इस्लामपूर : पूर्वेच्या क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, नव्या वर्षाची किरणं पसरली होती... त्या क्षणाला इकडे "आरं आज सूर्य कुणीकडं उगवलायं', असा प्रश्‍न पडण्यासारखा क्षण "याची देही, याची डोळा' इस्लामपूरकर अनुभवत होते. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे संस्थापक खासदार राजू शेट्टी एकाच सायकलवर स्वार होऊन " जाऊया डबल शीट रं लांब लांब लांब' चं गीत गात होते. तुमचं आमचं जमलं फिट्ट, सायकलवर जाऊ डबल शीट हा नारा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिला जाणार, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. 

निमित्त होते "सकाळ' माध्यम समूह आणि जायंट्‌स ग्रुपतर्फे आयोजित "सायकल रॅली'चे. दरवर्षी 1 जानेवारीला हा सोहळा इस्लामपुरात रंगतो. यंदा त्यात शेट्टी-जयंतरावांची डबलशीट चर्चेचा विषय ठरली. जयंतरावांनी राजू शेट्टी यांच्या सायकलचे सारथ्य करत लोकसभा निवडणूकीत "मी शेट्टींचा सारथी', असेन असा जणू शंख फुंकला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक आधी असल्याने शेट्टीसाहेब पुढे बसुदेत, असे म्हणत जयंतरावांना ड्रायव्हर शीट ऑफर केली. त्यावर जयंतरावांनी "मी अगोदर ट्रायल घेतो' असे म्हणत शेट्टींना घेऊन फेरफटका मारला. 

एकमेकांचे कट्टर विरोधक अशीच जयंतराव व शेट्टींची ओळख होती. या दोघांनी एकमेकांची जिरवण्यासाठी क्‍लृप्त्या लढवल्या. भरसभेत एकमेकांवर चिखलफेक केली. शेट्टींचा वारु रोखण्यासाठी जयंत पाटलांनी देव पाण्यात घातले होते. यापुर्वी निवेदीता माने व कल्लाप्पाण्णा आवाडे यांना हाताला धरत लोकसभेच्या आखाड्यात डाव-प्रतिडाव टाकले होते. पण, शेट्टी त्याला नमले नाहीत, पुरुन उरले. आता काळ बदललाय. 

"राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो', हे सत्यवचन कदाचित शेट्टी-जयंतरावांना नेमकेपणानं लागू व्हायला लागलं आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात दोघांनीही एकत्र दंड थोपटले आहेत. इस्लामपुरच्या आखाड्यात कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांना भाजपने चांगलेच बळ दिले आहे. त्यामुळे जयंतरावांपुढे सतत आव्हान उभारण्याचा सदाभाऊंचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शेट्टी-सदाभाऊ संघर्ष पेटला आहे. अशावेळी या पाटील व शेट्टी या दोघांची एकी नव्या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब करणारीच आहे. 

इस्लामपूर येथील सायकल रॅलीसाठी दोघेही नेते एकत्र आल्यावर त्यांनी एकमेकांच्या बरोबर दिलखुलास गप्पा रंगल्या. सुमारे दोन किलोमीटर सायकल एकत्र चालवली. जयंतरावांनी शेट्टी यांना सायकलवर डबलशीट घेत फेरफटका मारला. सायकलने गती घेताना जयंत पाटील प्रारंभी जरा डगमगले, मात्र सर्वच क्षेत्रात मुरब्बी असलेल्या जयंतरावांनी काही क्षणातच शेट्टींचं ओझं सावरुन घेत गती घेतली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com