Nejdar taunted Vishwas patil : you are not Vasant dada patil , don't compare with him | Sarkarnama

तुम्ही कुठं वसंतदादा आहात ? असे म्हणताच मारामारीला सुरवात झाली 

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

जिल्हा दूध संघाची (गोकुळ) वार्षिक सभा शुक्रवारी (ता. 21) होत आहे. यापार्श्‍वभूमीवर गोकुळ मल्टिस्टेट करण्याबाबत किंवा सभासदांच्या इतर समस्या जाणून घेण्यासाठी संचालक मंडळ तालुक्‍यात संर्पक दौरा करत आहे. बुधवारी  करवीर तालुका संर्पक दौऱ्याचे नियाजन गोकुळच्या कार्यालयात केले होते.

कोल्हापूर  : आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना उद्देशून तुम्ही कुठं वसंतदादा आहात असा टोमणा मारताच सभागृहात भडका उडाला आणि   मारामारीला सुरवात झाली . 

विश्वास पाटील यांनी अहवालातील इंग्रजी बाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती . मला इंग्रजी येते का असे काही जण पाहत आहेत पण वसंतदादा पाटील सातवी पास होते तरी मुख्यमंत्री झाले होते असा टोला लगावला होता . विश्‍वास नेजदार यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना उद्देशून पण तुम्ही कुठे वसंतदादा पाटील आहात ? असा प्रतिटोला लागवल्याने सभागृहात विश्वास पाटील यांच्या समर्थकांनी श्री नेजदार यांच्यावर हल्ला चढवला . 

उपस्थित सभासदांचे प्रश्‍न शांततेत द्या, हे बरोबर, हे चुक म्हणून गोंधळ नको असे म्हणत गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला? असा जाब राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी केला. यावर सत्तारूढ गटाच्या कार्यकर्त्यांनी नेजदार यांच्यावर खुर्च्या भिरकावत मारहाण केली. त्यामुळे आज गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या करवीर तालुका संपर्क सभेत गोंधळ उडाला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. 

सभा सुरू होत असताना विरोधी गटाचे संस्था प्रतिनिधी मागे उभे होते. गोकुळचे अध्यक्ष पाटील यांनी या प्रतिनिधींना पुढे येण्यास सांगितले.

 दरम्यान, संस्था प्रतिनिधी बसण्याआधीच करवीर तालुक्‍यातील प्रतिनिधींनीच सभागृह भरून गेले आहे. त्यामुळे बसण्यासाठी जागा कुठे आहे. असा सवाल किरणसिंह पाटील यांनी केला. तसेच ते कार्यकर्त्यांसह व्यासपीठासमोर आले. पण, बसण्यासाठी जागा असतानाही तुम्ही जाणीवपूर्वक बसत नसल्याची टिका पाटील यांनी केली. याचवेळी दोन्ही गटातील समर्थकांच्या वादाला सुरूवात झाली.

 सभागृह हाऊस फुल्ल झाले असताना जागा आहे म्हणून पाटील कसे काय सांगतात असा जोरदार सवाल केला जावू लागला. यातूनच एकमेकांना धक्काबुक्की होत राहिली आणि वातावरण तणावपूर्ण झाले. दहा ते पंधरा मिनिटे गोंधळ सुरुच राहिला. हा गोंधळ होत असतानाच पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

अध्यक्ष पाटील यांनी संघाची प्रगती कशी आणि भविष्यातील कामकाज कसे असणार योजना कोणत्या राबविणार याचा आढावा घेतला.

यावेळी श्री पाटील आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता म्हणाले, काही मंडळी मला इंग्रजी वाचता येते का बघत आहेत पण, वसंतदादा पाटील सातवी पास होते. तरीही ते मुख्यमंत्री झाले. हे लक्षात ठेवले पाहिजे. येथे शिक्षणाबाबत काहीही सांगू नका. तसेच गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा विषय सर्वसाधारण सभेपुढचा आहे. सर्वसाधारण सभेतच याची चर्चा केली जाईल. आता यावर चर्चा करणे चुकीचे आहे. असे ठणकावून सांगितले. 

याला जोरदार विरोध करत बाबासाहेब चौगले म्हणाले, गोकुळ मल्टिस्टेट पोटनियम दुरुस्तीचा मजकूर इंग्रजित का छापला आहे. संस्था प्रतिनिधी किंवा सभासदांना यांची माहिती कशी मिळणार. केवळ आमच्याकडून यावर टिका झाल्यानंतर तो इंग्रजी मजकूर मराठी छापला आहे.

 यानंतर विश्‍वास नेजदार म्हणाले, आम्ही प्रश्‍न विचाराते, तुम्ही शांतपणे उत्तरे द्या. आम्ही काही प्रश्‍न विचारला तर खालुन कोणतरी बरोबर किंवा चुकीचे म्हणून गोंधळ घालत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. आपण सर्व सुज्ञ आहात त्यामुळे तुम्ही सभासदांच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत. सभेतील लोकांना बोलण्यापासून थांबवू नका. सभेत हा चुकीचा पायंडा कशासाठी पाडता. ? 

श्री नेजदार पुढे म्हणाले, वसंतदादा पाटील यांच्यासारखे नेते कोटीत एखादे होतात आणि वसंतदादा म्हणजे तुम्ही नव्हे, अशी टिपणीही नेजदार यांनी केली. यावर सभागृहात जोरदार टाळ्या होवून हशा पिकला.

त्यामुळे अध्यक्ष पाटील यांचा समर्थक नेजदार यांच्या अंगावर धावून गेले, त्यातूनच झटापटी आणि हाणामारी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. नेजदार यांच्या दिशेने दोन ते तीन खुर्च्या त्यांच्या दिशेने भिरकावल्या. नेजदार यांच्या डोक्‍यात खुर्ची लागली. त्यामुळे गोंधळ अधिक वाढला. 

 

संबंधित लेख