Nehru had predicted that Vajpayee will be PM one day | Sarkarnama

नेहरू म्हणाले होते, अटलजी हे भविष्यात पंतप्रधान होतील : शिवराज पाटील

सुशांत सांगवे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वाजपेयी हे महान व्यक्तीमत्व होते. महान कवी होते. इतिहासाचे जाणकार होते. स्वच्छ राजकारणी होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी उत्तम काम केले.

लातूर : " लोकसभेत साठच्या दशकात  बोलायला पुरेसा वेळ मिळत नव्हता म्हणून ‘मी आता बोलणारच नाही’, असे म्हणत अटलजी रागारागात बाहेर पडले. हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना कळले. नेहरू हे कायम तरुणांना प्रोत्साहन देत असत. त्यामुळे त्यांनी तातडीने अटलजींना परत बोलावले आणि भाषणाची संधी दिली."

"त्यानंतर सलग दोन-तीन तीस अटलजी बोलत होते आणि सगळे सभागृह त्यांना ऐकत होते. अशा नेत्याची पंडितजींनी एका सोहळ्यात ‘फ्यूचर प्राईम मिनिस्टर’ म्हणून ओळख करून दिली होती,"  अशा शब्दांत अटलबिहारी वाजपेयीच्या आठवणींना लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील-चाकूरकर यांनी उजाळा दिला . 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी निधन झाले. अजातशत्रु म्हणून ओळखले जाणाऱ्या, सभ्य राजकारणाने विरोधकांचीही मने जिंकणारे अटलजींचे आपल्यातून जाणे अनेकांना चटका लावणारे ठरले आहे.

 शिवराज पाटील-चाकूरकर यांनीही अटलजींना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना  व्यक्त केल्या. आम्हा दोघांच्या वयात अंतर होते. त्यामुळे अटलजींना मी गुरूच मानत होतो. आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी आमच्यातील आपुलकी, आमच्यातील प्रेम व जवळीक यामुळे आमच्यात निखळ मैत्रीही होती, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘‘वाजपेयी हे महान व्यक्तीमत्व होते. महान कवी होते. इतिहासाचे जाणकार होते. स्वच्छ राजकारणी होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी उत्तम काम केले. स्वत:बद्दल कुठलीही आक्षेपार्ह घटना होऊ दिली नाही. ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा पुढे नेत त्यांनी ‘जय विज्ञान’ असा नाराही दिला होता. त्यांचा विज्ञानावर जसा विश्वास होता तसा आध्यात्मावरही विश्वास होता. देशाच्या प्रगतीसाठी कुठलाही  लहान विचार घेऊन ते जगत नव्हते. सतत मोठा विचार करत असायचे. त्यांचे कार्य भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, असेच आहे.’’

" एका सोहळ्याला पंडितजी उपस्थित होते. त्यावेळी तिथे अटलजीही होते. पंडितजींना पाहून ते पुढे येत नव्हते. पंडितजींना त्यांना पुढे घेतले आणि म्हणाले, ‘हा मुलगा सतत आमच्यावर टीका करतो. पण हा ‘फ्यूचर प्राईम मिनिस्टर’ आहे बरं का.’ त्यांचे हे विधान फार महत्वाचे आहे. ते काही वर्षांनी खरेही ठरले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या प्रमाणेच अटलजींच्या मनातही माझ्याबद्दल आपुलकी होती. त्यांनी कधीही मला विरोध दर्शविला नाही. निवडणूकीच्या प्रचारासाठी ते लातुरात आले. खरंतर ते लातूरात यायला तयार नव्हते. तरी ते आले; पण माझ्या विरोधात जाहीर सभेसुद्धा ते काहीही बोलले नाही. त्यांनी मला कायमच चांगली वागणूक दिली. ती कायम माझ्या स्मरणात आहे," अशी  भावना शिवराज  पाटील यांनी व्यक्त केल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख