Neelam Gorhe Criticises Nawab Malik | Sarkarnama

सापळा रचण्याच्या गोष्टी मलिक यांनी करू नये : निलम गोऱ्हे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 जुलै 2017

नवाब मलिक यांचा सल्ला महिला अत्याचार प्रश्नी मला आवश्यक वाटत नाही - निलम गोऱ्हे

मुंबई : मलिक यांनी सापळा रचण्याच्या गोष्टी करू नये, असा पलटवार शिवसेना प्रवक्त्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी मलिक यांच्या वक्तव्यावर केला आहे. काल दुपारी पत्रकार परिषदेत आमदार निलम गोऱ्हे यांच्यामुळे संबंधित तुरुंग अधिकाऱ्याभोवती सापळा रचला आला नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी गोऱ्हे यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना अन्याय मांडणाऱ्या स्रियांचा धीर वाढावा व भविष्यात स्रियांचे शोषण होऊ नये म्हणून हा प्रपंच केल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी 'सरकारनामा' शी बोलताना स्पष्ट केले. तसेच सापळे लावण्याच्या गोष्टी मलिक यांनी करू नयेत व आम्हाला शिकवू नये, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

जेलमधील महिला अधिकाऱ्यांवर होणाऱ्या शोषणाचे पत्रक आम्हाला सुद्धा आले होते. त्यात संबंधित अधिकारी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सापळा रचून त्या अधिकाऱ्याला पकडण्यात यावे व त्याला शिक्षा व्हावी. परंतु, निलम गोऱ्हे यांनी हे पत्र प्रसारमाध्यमां पर्यंत पोहचविले. त्यामुळे संबधित अधिकारी हा सावध झाला असून त्यावर आरोप सिद्ध करणे कठीण जाईल, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केले होते.

'अन्याय मांडणाऱ्या स्त्रियांचा धीर वाढावा व अजुन काही महिलांचे शोषण होऊ नये याचा संदेश संबंधित महिलांपर्यंत पोहचावा. तसेच यासाठी माध्यमातून माहिती पोहचणे गरजेचे आहे जेणेकरून बाकीच्या महिला या अत्याचाराचे बळी पडणार नाहीत. नवाब मलिक यांचा सल्ला महिला अत्याचार प्रश्नी मला आवश्यक वाटत नाही,' असे गोऱ्हे यांनी मलिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले.

संबंधित लेख