ncp's two corporator disqualified in kolhapur | Sarkarnama

राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक अपात्र; भाजप-ताराराणी आघाडीने ताकद पणाला लावली!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 डिसेंबर 2018

महापौर, उपमहापौर निवडणुकीत पुन्हा घोडेबाजाराच्या दिशेने राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : महापालिकेतील दोन्ही कॉंग्रेसच्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी राजकीय हालचालींना काल सकाळपासूनच जोर आला. स्थायी समिती सभापती निवडीत पक्षादेश डावलून विरोधी आघाडीला मतदान करणाऱ्या अफजल पिरजादे व अजिंक्‍य चव्हाण या दोन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले. याबाबतचा आदेश रात्री उशिरा आयुक्‍त कार्यालयाला प्राप्त झाला. 

शनिवारी (ता. आठ) या दोघांना हा आदेश बजावण्यात येणार आहे; तर जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी मुंबईत जोरदार हालचाली सुरू झाल्या. कोणत्याही क्षणी हा आदेश येण्याची शक्‍यता आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी राजकीय ताकद पणाला लावल्याची चर्चा आहे. या सात नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक दोन्ही कॉंग्रेसचे, तर एक भाजपचा आहे. ही कारवाई झाल्यास सत्तारूढ दोन्ही कॉंग्रेसचे संख्याबळ 44 वरून 38 इतके खाली येणार आहे. 

स्थायी समितीपाठोपाठ महापौर निवडणुकीतही बाजी मारण्याच्या हालचाली भाजप-ताराराणी आघाडीकडून सुरू आहेत. स्थायी समितीत झालेला धोका लक्षात घेऊन दोन्ही कॉंग्रेसनेही सावध भूमिका घेत सत्ता टिकविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर, उपमहापौर निवडणुकीत पुन्हा घोडेबाजाराच्या दिशेने राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

अफजल पिरजादे आणि अजिंक्‍य चव्हाण या दोघांनीही पक्षादेश डावलून विरोधी आघाडीच्या उमेदवाराला स्थायी समिती सभापती निवडीत मतदान केल्याने त्यांच्याविरोधात विभागीय आयुक्तांकडे खटला दाखल होता. अशा एकूण सातजणांवर अपात्रतेची कारवाई झाल्याची चर्चा आज महापालिका वर्तुळात पसरल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली. 
 
महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी (ता. दहा) निवडणूक होणार आहे. त्यात राष्ट्रवादीकडून सरिता मोरे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांचे अर्ज आहेत. भाजप- ताराराणी आघाडीने जाधव यांना उमेदवारी देऊनच आपला इरादा स्पष्ट केला आहे. सर्व तयारी ठेवूनच जाधव निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्थायी सभापती निवडीप्रमाणेच या निवडणुकीतही धक्का देण्याचा भाजप-ताराराणीचा डाव आहे. सरिता मोरे या अनुभवी नगरसेविका आहेत. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. नंदकुमार मोरे 30 वर्षे राजकारणात आहेत. त्यांचे सर्व राजकीय पक्षांत संबंध असल्याने त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न होणार आहे.

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची
या सात नगरसेवकांवर कारवाई झाल्यास दोन्ही कॉंग्रेसचे संख्याबळ 44 वरून 38 वर येणार आहे. भाजप-ताराराणीचे संख्याबळ 33 वरून 32 होणार आहे. मॅजिक फिगर 38 इतकी राहणार आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. ते चौघे महापालिका राजकारणात आतापर्यंत कॉंग्रेसकडे आहेत. त्यांनी भूमिका तशीच ठेवली तर दोन्ही कॉंग्रेसचे पारडे जड होणार आहे; पण त्यांची भूमिका बदलली, तर मात्र काट्याची टक्कर होण्याची शक्‍यता आहे.

चौघे शिवसेना-भाजपकडे गेल्यास त्यांचा आकडा 36 वर जाऊ शकतो. आणखीन काही नगरसेवकांना ओढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्‍चित. फोडाफोडीच्या राजकारणाला या दोन दिवसांत ऊत येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही आघाड्यांनी तसे काही चेहरे हेरून ठेवले आहेत. मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी असा मोठा संघर्ष होणार आहे.

 

संबंधित लेख