ncp`s performance downside...vandana chavan`s opportunity upside | Sarkarnama

पुण्यात राष्ट्रवादीची कामगिरी खालावली...! वंदनाताईंची कारकिर्द उंचावली!

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 1 मार्च 2018

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे येणार आहे. या जागेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या इतर बड्या नेत्यांना डावलून चव्हाण यांच्या नावाचा विचार झाला. त्यामुळे त्यांचे पक्षातील वजन आजही कायम असल्याचे यातून दिसून आले. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मात्र बुचकळ्यात पडले आहेत.

 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यसभेच्या खासदारकीसाठी वंदना चव्हाण यांची पुन्हा वर्णी लागल्याने पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाचा सुशिक्षित आणि अभ्यासू चेहरा म्हणून  नेतृत्त्वाने त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली आहे.

मात्र त्यांच्या शहराध्यक्षाच्या कारकिर्दीत पक्ष पुण्यात सत्तेबाहेर फेकला गेल्याचा आक्षेप त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्यांच्यावर घेत आहेत. पुण्यात पक्षाचा कामगिरीचा आलेख खालावत असतानाही वंदनाताईच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असल्याची प्रतिक्रिया हे विरोधक देत आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चव्हाण या गेली आठ वर्षे शहराध्यक्षा आहेत. पुण्यात एखाद्या पक्षाची जबाबदारी एकाच व्यक्तिकडे असल्याची अशी दोनच उदाहरणे आहेत. या आधी अभय छाजेड हे कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी अकरा वर्षे होते. वंदनाताईंच्या काळात पुणे महापालिकेच्या 2012 आणि 2017 अशा दोन निवडणुका झाल्या. 2012 मध्ये पुण्यात सत्तेवर असलेला पक्ष हा आता विरोधी पक्षात आहे. पक्षाची कामगिरी खराब झाली म्हणून त्यांनी राजीनामाही दिला होता. मात्र तो स्वीकारला गेला नाही. त्यामुळे त्यांचे शहराध्यक्षपद कायम राहिलेच. उलट खासदारकीचाही बोनस त्यांना मिळाला. 

पक्षाकडे शहरी चेहऱ्याची वानवा आहे. याची पक्षनेतृत्त्वाला जाणीव असल्याने जाणीवपूर्वक वंदना चव्हाण यांना संधी दिल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या कर्जत येथे झालेल्या चिंतन बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी चव्हाण यांच्या नावाचा व त्यांच्या कामगिरीची दोनदा-तीनदा उल्लेख केला होता. तेव्हाच वंदनाताईंना पुन्हा खासदारकीसाठी संधी मिळणार की काय, याचे संकेत तेव्हा मिळाले होते. या आधी 1999 मध्ये एकत्रित कॉंग्रेस असताना वंदना चव्हाण यांनीच लोकसभेची निवडणूक लढविण्याचा आग्रह शरद पवार यांनी त्यांना केला होता. मात्र तेव्हा त्यांनी नकार दिला होता. ती संधी पवार यांनी त्यांना 2012 आणि 2018 मध्ये परत दिली. 

पक्षाचे शहरातील इतर काही नेते हे मात्र वंदना चव्हाण यांच्या प्रगतीबाबत फारसे समाधानी दिसले नाहीत. त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांशी कनेक्‍ट नसल्याचा मुद्दा मांडतात. तसेच कॉर्पोरेट पद्धतीने पक्ष चालविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जुन्या व ज्येष्ठ नेत्यांना चव्हाण यांनी दूर सारले. त्यामुळे जनाधार असलेले नेते पक्षापासून दूर गेल्याचा आक्षेप घेण्यात येतो. त्यामुळेच 2012 मध्ये सत्तेवर असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस ही 2017 मध्ये विरोधात बसल्याचे या ज्येष्ठांचे म्हणणे आहे. स्वयंसेवी संस्थांच्या पाठीराख्या, पर्यावरणवादी, हायफाय अशी त्यांची प्रतिमा असली तरी पक्षाला त्यामुळे मते मिळू शकत नाहीत. उलट पक्षाचा जनाधार सामान्य आणि तळागाळातील माणूस आहे. अशा मतदाराला अशा चेहऱ्यांचा उपयोग नाही. त्याऐवजी एखाद्या जनाधार असलेल्या नेत्याला संधी मिळाली असती तर पक्षाला अधिक फायदा झाला असता, असेही याबाबत सांगण्यात आले.

याउलट वंदना चव्हाण यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार 2012 च्या निवडणुकीतील पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 2017 मध्ये एकने वाढली. इतर पक्षांची मोदी लाटेत धुळधाण उडाली. त्या तुलनेत राष्ट्रवादीची कामगिरी उजवी राहिल्याचा चव्हाण समर्थकांचा दावा आहे. शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाची वाताहात झाली असताना पुण्यात पक्षाने तुलनेने बरी कामगिरी केल्याचेही या समर्थकांनी पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आणून दिले. चव्हाण यांची राज्यसभेतील कामगिरीही उजवी ठरल्याचे हे समर्थक सांगतात. शहराध्यक्षपदासाठी जसा चव्हाण यांना पक्षाला पर्याय सापडला नाही. तसेच राज्यसभेबाबतही घडले असावे. त्यामुळेच त्यांच्या गळ्यात पुन्हा खासदारकीची माळ पडली.  

संबंधित लेख