ncp's interview in nagar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

संग्राम जगतापांनी इच्छुकांना पारखले, विचारले विजयाचे गणित!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

१५१ जणांच्या मुलाखती झाल्या. सर्व जण काय कामे करणार हे त्यांच्या प्रभागातील लोकांसमोर बोलून दाखवित होते. भाजप पारदर्शक कारभाराविषयी बोलते, पण मुलाखती चार भिंतीच्या आत घेतल्या. आम्ही खुल्या मुलाखती घेवून पारदर्शकता दाखविली, असे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी सांगितले.

नगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. मुलाखतीत पश्न विचारताना राष्ट्रवादीकडूनच का हवी उमेदवारी, प्रभागाची कितपत माहिती, काय कामे करणार, प्रभागातील प्रश्न असे प्रश्न विचारण्यात आले. 

ही मुलाखत बंद खोलीत नव्हे, तर सर्वांच्या समोर घेण्यात आल्याने विकासाचा अजेंडाच पुढे करण्याची वेळ उमेदवारांवर आली. आमदार संग्राम जगताप यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती करून विजयी होण्याची ताकद कितपर्यंत आहे, ते पारखून घेतले. अर्थात ही निवडणूक महापालिकेची असली, तरी तयारी विधानसभेचीच असल्याचे दिसून आले. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज १५१ जणांच्या मुलाखती झाल्या. इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, प्रदेश सरचिटणीस आंबादास गारुडकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते आदींनी मुलाखती घेवून त्यांची प्रभागातील शक्ती आजमावून घेतली. बहुतेक उमेदवारांनी आपण संग्राम भैय्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागाचा विकास करू, असे आश्वासन दिले.  

आगामी विधानसभेच्या दृष्टीने आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कारण लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत जास्तीत जास्त जागा मिळविणे आवश्य आहे. त्याचे प्रतिबिंब आजच्या मुलाखतीतून जाणवले. आमदार जगताप यांनी अनेक पश्न विचारून निवडून आलेच पाहिजे, असे काय करणार, हे लोकांना सांगा, ते आश्वासन कसे पूर्ण करणार हे पटवून द्या, असा सल्लाही इच्छुकांना दिला. त्यामुळे ही निवडणूक नुसती महापालिकेचीच नाही, तर विधानसभेची तयारी असल्याने संग्राम जगताप यांनी ती प्रतिष्ठेची केली आहे.

 
 

संबंधित लेख