ncp's 3 mp may be go in bjp | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या चारपैकी 3 खासदारांना पक्षांतर्गत तीव्र विरोध

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील आणि धनंजय महाडिक यांचा पहिले प्राधान्य मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षालाच राहील !

पुणे: मोदी लाटेत 2014 ला कॉंग्रेसपेक्षा दुप्पट जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीच्या चार खासदारांपैकी 3 खासदारांना पक्षांतर्गत विरोध सुरू झाला आहे.

2014 ला बारामती, सातारा, माढा आणि कोल्हापूर या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. मात्र आता 2014 ला जिंकलेले उमेदवार 2019 ला कायम राहतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोल्हापुरात लोकसभेला राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या धनंजय महाडिक यांनी सर्वांत पहिल्यांदा पक्षाला दुय्यम लेखत स्वतंत्र एजेंडा राबवला. त्यांचे चुलतभाऊ भाजपचे आमदार आणि वहिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या आहेत. या घडामोडीत त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा भाजपचे उमेदवार निवडून येण्यास प्राधान्य दिले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांच्याशी एवढी जवळीक की, त्यांनी धनंजय महाडिक हे मंत्री होतील, असे भाकित केले आहे. 

कोल्हापुरात जिल्हा परिषदेची सत्ता काठावर असताना भाजपची सत्ता यावी म्हणून धनंजय महाडिकांनी प्रयत्न केले. मतदानाच्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असणारी लक्‍झरी बस ते स्वत:च चालवत होते. यानंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी थेट भूमिका घ्यायला सुरवात केली. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहिलेले संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीत घेवून तिकीट देण्याची तयार केली. या प्रयत्नांना कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांची साथ आहेच. त्यामुळे धनंजय महाडिक सावध असून ते सातत्याने राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. ते कोल्हापुरात राष्ट्रवादीत नसलेतरी कोल्हापुरबाहेर मात्र ते राष्ट्रवादीत असतात. 

महाडिक कुटूंब भाजपसाठी काम करत असल्याने धनंजय हे भाजपचे उमेदवार होणार, अशी शक्‍यता धरुन राजकीय आडाखे बांधले जात आहेत. त्याचे प्रत्यंतर दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी पक्षातील मुंबईतील आढावा बैठकीत दिसले. तिथे धनंजय महाडिक एकटे पडले. कोल्हापूर राष्ट्रवादीने त्यांचे नाव सुचवण्याचे दूरच,अविश्‍वास व्यक्‍त केला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी शरद पवार आपले परमेश्‍वर असल्याचे म्हटले आहे. स्वत:हून राष्ट्रवादी सोडणार नाही, असेही म्हटले आहे. दुसरा अर्थ तिकीट दिले नाहीतर भाजपकडे जाणार, असा सरळ आहे. 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी पक्षाचे कधी पटले नाही, मात्र उपद्रवमूल्यामुळे त्यांना 2009 आणि 2014 ला तिकीट मिळत आले आहे. मात्र दीड वर्षापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. सातारा तालुक्‍यात त्यांनी थेट भाजपशी युती केली. तत्पुर्वीच्या नगरपालिका निवडणुकीत त्यांचे चुलतभाऊ, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नीचा पराभव घडवून आणला. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचे कधी पटले नाही. त्याचा परिणाम राष्ट्रवादीचे सर्व आमदार उदयनराजेंविरोधात गेले आहेत. त्यांनी उदयनराजेंना तिकीट देवू नये, अशी भूमिका घेतली आहे. मुंबईतील बैठकीला उदयनराजे वेळेत पोहचू शकले नाहीत. त्या बैठकीत रामराजे यांच्यासह इतर लोकांसाठी तिकीटाची मागणी करण्यात आली. त्यातून उदयनराजेंसाठी आवश्‍यक संदेश गेला आहे. त्यानंतर काही पक्षांनी उदयनराजेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यात महत्त्वाची ऑफर भाजपची आहे. तसेच उदयनराजेंनी वेळोवेळी पक्षाला इशारे देवून आपला इरादा जाहीर केला आहेच. 

उदयनराजे अथवा धनंजय महाडिक यांच्यापेक्षा माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची परिस्थिती वेगळी आहे. उदयनराजे आणि महाडिकांनी पक्षाला उपद्रव केला आहे, तर मोहिते पाटलांना पक्षाचा उपद्रव झाला आहे. गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटलांचे वर्चस्व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशिर्वादाने संपवण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या काही गटांनी लोकसभेला त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अकलूज परिसराच्या भरवशावर मोहिते पाटील 25 हजार मतांनी निवडून आले. मात्र अजूनही त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष संपलेला नाही. त्यांच्या सहकारी संस्थाही अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांना भापजशी जुळवून घ्यावे लागत आहेत. त्यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मध्यंतरी अकलूजमधील कार्यक्रमाला त्यांनी केंद्रियमंत्री सुरेश प्रभू यांना बोलावले होते. राष्ट्रवादीतले लोक अधिक त्रास देतात, असा मोहित पाटील कुटूंबियांचा अनुभव आहे. मात्र त्यांनी कधी जाहीर भाष्य केलेले नाही. 

माढा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रभाकर देशमुख यांची नावे पुढे आली आहेत. हाही मोहिते पाटलांचा एक प्रकारचा मेसेज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अडवणूक झालीतर तेही भाजपचा मार्ग चोखाळू शकतात.

 

संबंधित लेख