NCP Women Wing In Pune Appoints Chandani Gore as Vice President | Sarkarnama

तृतीयपंथी चांदणी गोरेंची पुणे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 मार्च 2019

काल महापालिकेच झालेल्या एका कार्यक्रमात महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दिलीप बराटे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत चांदणी गोरे यांना उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी तृतीयपंथी असलेल्या चांदणी गोरे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर हा निर्णय घेण्याची भूमीका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

काल महापालिकेच झालेल्या एका कार्यक्रमात महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दिलीप बराटे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत चांदणी गोरे यांना उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याबाबत सुप्रिया सुळे यांनी या पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले आहे. ''तृतीयपंथीयांना सन्मानाने जगणअयाचा हक्क आहे. या लोकांना अनेक जण गृहीत धरत नाहीत. तृतीयपंथीयांना समाजात योग्य ते स्थान मिळाले पाहिजे आणि समान संधी मिळाल्या पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे," असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर म्हटले आहे.

चांदणी गोरे या उच्चशिक्षित असून त्यांनी 'एमएसडब्ल्यू' केले आहे. त्या विविध शाळांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुला-मुलींमध्ये चांगला स्पर्श- वाईट स्पर्श याबाबत जागृती करतात. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरोगामी विचार पुढे नेण्याचा पुणे शहर महिला आघाडीचा हा प्रयत्न आहे. उपेक्षित-वंचितांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे हा यामागचा उद्देश आहे. राज्यातली अशा प्रकारची ही पहिलीच नियुक्ती आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. इथून पुढे आलेला विचार सर्वत्र पसरतो. त्यामुळे पक्षाच्या महिला आघाडीने चांदणी गोरे यांना महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय घेतला."

 

 

संबंधित लेख