शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आठ दिवसांत उमेदवार : सुप्रिया सुळे 

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आठ दिवसांत उमेदवार : सुप्रिया सुळे 

नारायणगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.


जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. 29) कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुळे यांनी तालुका बूथ कमिटीचा आढावा घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.

शिरूरमध्ये पक्षाला गेल्या तीन निवडणुकांत सलग पराभव स्वीकारावा लागला. येथे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार हा निवडणुकीच्या किमान तीन-चार महिने आधी जाहीर करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळे आता या वेळी पक्षाने तसा निर्णय घेतल्याचे सुळे यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

संभाव्य नावांमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप,  देवदत्त निकम आदींचा समावेश आहे. आता राष्ट्रवादी यापैकी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे.   

या कार्यक्रमात सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. अनेक तालुक्‍यांत बूथ कमिट्यांची स्थापना केली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नाराज झालेल्या सुळे यांनी जमत नसेल तर मी माझे कार्यकर्ते पाठवते, असे खडेबोल तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार व पदाधिकारी यांना सुनावले. तीन डिसेंबरपूर्वी बूथ कमिट्यांची स्थापना करण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले. 

खासदार सुळे म्हणाल्या, ""सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून राज्यात अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे कारखाने बंद पडले असून सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. बाजारभावाअभावी अन्नधान्याला देव मानणारा शेतकरी कांदा, टोमॅटोसह इतर शेतमाल रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त करत आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com