ncp strategy for nagar corporation | Sarkarnama

भाजपच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे 36 स्टार प्रचारक मैदानात!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

राज्य निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली आहे.

नगर: भाजपने केडगावमध्ये जादू घडवून आणत काँग्रेसचे खच्चीकरण केले. साहजिकच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे भाजपची सरशी झाली आहे. भाजपच्या या चालीवर तोफा डागण्यासाठी राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार पक्षाचे नेते जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्या सभा होणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने ३६ स्टार प्रचारकांची नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली असून, त्यात अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांबरोबरच दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, आमदार शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान आदींसह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

नगरमध्ये आता भाजप, शिवसेना व आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच खरी चुरस आहे. काँग्रेसचे काही उमेदवार भाजपने एकाच रात्रीत पळविल्याने काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. महापालिकेच्या १७ प्रभागांत भाजपने सर्वांत जास्त उमेदवार दिले असल्याने महापौरही भाजपचाच होईल, असा होरा राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मात्र कमी उमेदवारांतही काहीतरी जादू घडवून महापालिका ताब्यात घेण्याचा प्रय़त्न राष्ट्रवादीचा आहे. त्यासाठी स्टार प्रचारकांच्या तोफा प्रत्येक प्रभागांतून धडाडणार आहेत.

संबंधित लेख