NCP Protests In Front of Vikhe Patil | Sarkarnama

मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावरून विखे पाटलांशी राष्ट्रवादीचा 'संघर्ष' 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप 1 नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत होत आहे. तोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेसचे नेते शहरात असणार आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यात खोडा घातल्याचा आरोप असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना तीव्र विरोध होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

औरंगाबाद : राज्यभरात सत्ताधारी भाजप-सेना सरकारच्या विरोधात जनसंघर्ष यात्रा काढणाऱ्या काँग्रेसचा मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेत पाणी प्रश्‍नावरून राष्ट्रवादीशी 'संघर्ष' उडाला. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना घेराव घालत जाब विचारला. तर जालना रोडवरील केंम्ब्रीज चौकात शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेचा ताफा अडवत विखेंना काळे झेंडे दाखवत निषेध केला. 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप 1 नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत होत आहे. तोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेसचे नेते शहरात असणार आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यात खोडा घातल्याचा आरोप असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना तीव्र विरोध होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

नगर-नाशिक भागातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नऊ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. समन्यायी पाणी वाटप आणि पाणी कायद्यानुसार हे बंधनकार असतांना मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या विरोधात पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते, लोकप्रतिनिधींनी टोकाचा विरोध सुरू केला आहे. अगदी मुंडण, रास्तारोको आणि जलसमाधी घेण्याचा इशारा देखील देण्यात आला. 

त्यामुळे जायकवाडीसाठी 29 तारखेला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची भूमिका असल्याचे देखील बोलले जाते. जायकवाडीत पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विखे पाटील यांनीच एका साखर कारखान्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जनसंघर्ष यात्रा घेऊन मराठवाड्याच्या राजधानीत दाखल झालेल्या विखे पाटलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मराठवाडी हिसका दाखवला. एवढ्यावरच न थांबता विखेंना घेराव घालत मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर तुमची भूमिका काय? असा जाब विचारत विखेच्या विरोधात घोषणाही दिल्या. अनपेक्षितपणे झालेल्या या संघर्षामुळे काँग्रेसच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. आता पुढील दोन दिवस राधाकृष्ण विखे पाटलांना विविध पक्षांच्या आंदोलन आणि विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

काँग्रेसची मजबुरी...
जायकवाडी धरणात पाणी सोडू नये म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मतभेद, एकमेकांचे हेवेदावे, राजकारण बाजूला सारून एकजूट झाले आहेत. सरकार आणि पाटबंधारे विभागावर दबाव निर्माण करत त्यांनी जायकवाडीकडे जाणारे पाणी रोखून धरले. यात कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची असल्याचे बोलले जाते. तरी देखील जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यात येणाऱ्या विखेंसाठी पायघड्या घालण्याची वेळ इथल्या लोकप्रतिनिधींवर आली आहे. 

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी पाणी प्रश्‍नावर किती उदासीन आणि गाफील आहेत हे गेल्या आठवड्यात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या बैठकीवरून दिसून आले होते. बंब यांनी मराठवाड्यातील आमदार, खासदारांना एकत्रित येण्याचे आव्हान करत पाणी प्रश्‍नावर " हम साथ साथ है' दाखवण्याचा प्रयत्न केला. पण 48 पैकी 15 आमदारांनीच पाणी प्रश्‍नावरच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे हक्काच्या पाणी प्रश्‍नावर लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे, हे दिसून आले. 

विखे पाटलांना घेराव घालत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने संघर्षाची थिनगी टाकली आहे. पुढील दोन दिवस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संस्था, संघटनांच्या तीव्र आंदोलन आणि विरोधाला तोंड द्यावे लागणार असे दिसते. 

*#सरकारनामा होऊ दे चर्चा!*
राजकारणाची आजची दशा सांगणारा आणि उद्याची दिशा ठरवणारा #सरकारनामा.. प्रत्येकाच्या संग्रही असावा असा राजकीय दस्तावेज!
आजच जवळच्या विक्रेत्याकडं संपर्क साधा.. अंक Amazon.in वरही उपलब्ध आहे..\ #नातंशब्दांशी 
 

संबंधित लेख