NCP MP Supriya Sule Gets Sansadratna Award | Sarkarnama

खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 जून 2018

पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याची तड लागेपर्यंत केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना ‘प्राईमटाईम फौंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील 'आयआयटी'च्या सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधानांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 

यावेळी आयआयटी मद्रासचे डायरेक्टर भास्कर राममूर्ती, ‘प्राईमटाईम फौंडेशन’चे संस्थापक के. श्रीनिवासन आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला असून लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या  खासदारांना ‘प्राईमटाईम फौंडेशन’ आणि  ई-मॅगॅझीन 'प्रिसेन्स'च्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याची तड लागेपर्यंत केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. 

या निकषांच्या आधारे मान्यवरांची समिती ‘संसदरत्न’ पुरस्कारार्थीची निवड करते.  या मान्यवरांच्या समितीत ज्येष्ठ संसद सदस्यांचाही समावेश असतो. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ व अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता. 

पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, ''माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे. हा पुरस्कार मला जनतेलाच समर्पित करताना आनंद होत आहे.'' अशी भावना व्यक्त केली. 

पुरस्कार वितरणानंतर आयआयटी मद्रासधील काही निवडक विद्यार्थ्यांनी सुळे यांच्याशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांसमोर मतदारसंघात विकास साधण्यासाठी संसदेतील प्रभावी कामगिरी कशी साहाय्यभूत ठरते, तसेच सभागृहात प्रश्न मांडून तडीला कसे न्यावेत, याविषयी एक सादरीकरणही केले.

संबंधित लेख