NCP MP Supriya Sule attacks shivsena At Paithan in a traders meet | Sarkarnama

शिवसेनेची परिस्थिती म्हणजे एक हात मे दो लड्डू : सुप्रिया सुळे

चंद्रकांत तारू 
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

पैठण हे एक एेतिहासिक शहर आहे पण इथला विकास खुंटला आहे, याबाबत खासदार सुळे यांनी  नाराजी व्यक्त केली.  

पैठण :  " शिवसेनेची परिस्थिती म्हणजे एक हात मे दो लड्डू, अशी झाली आहे . सरकारवर टीकाही करतात आणि सत्तेतही राहतात. हे सरकारला फक्त धमकी देतात की सत्ता सोडून जाऊ. आता भाजपलाही सवय झाली आहे. तेही काही प्रतिक्रिया देत नाही. त्यांनाही माहिती आहे हे कुठे जात नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया  सुळे यांनी शिवसेनेवर टीका केली . 

खासदार सुप्रिया सुळे  यांनी पैठण  तालुक्यातील व्यापाऱ्यांशी नुकताच  संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी प्लास्टिक बंदीमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याची खंत अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली. दुकानदारांकडून धाडी पाडून नाहक दंड आकारला जात आहे. सरकारने प्लास्टिकला पर्याय दिला नाही. त्यामुळे आम्ही काय करावे, असा प्रश्न त्यांनी केला. ग्राहक आमच्यावर नाराज होतात. आम्ही व्यापार करावा तरी कसा, असेही ते म्हणाले.

ऑनलाइन औषध विक्री व्हायला नको, अशी मागणीही व्यापारी वर्गाने केली. सरकारने व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यांच्या हितासाठी धोरणे राबवायला हवीत, अशीही मागणी त्यांनी केली. 

व्यापाऱ्यांशी चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी जीएसटीबाबत अद्यापही संभ्रम असल्याचे सांगत जीएसटी टप्प्याटप्प्याने अमलात आणायला हवी होती असे मत व्यक्त केले. जीएसटीला आमचा विरोध नाही पण याचा व्यापाऱ्यांना त्रास व्हायला नको असेही त्या म्हणाल्या. केमिस्ट आंदोलनाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, ऑनलाइन विक्रीमुळे मोठ्या अडचणी आहेत. तिथे फार्मसिस्ट नसणार. चुकीचे औषध विकले जातील. लोकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो.

या बैठकीस माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश उपाध्यक्ष कादिर मौलाना आणि व्यापारी मित्र उपस्थित होते.

महिला मेळावा 

जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठण येथे महिला मेळाव्यासही  मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान  याही उपस्थित होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर अांगणवाडी सेविकांचे प्रश्न आधी मार्गी लावू, एसटीची सुविधा नीट करू, बचत गटांकडेही लक्ष घालू, असे आश्वासन सुप्रियाताईंनी यावेळी दिले.

माजी आमदार संजय वाघचौरे यांनी यावेळी शिवसेना आम्हाला १५ वर्षांचा हिशोब विचारतेय. शिवसेनेने चार वर्षांत एक पिठाची गिरणी तरी सुरू केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. पश्चिम बंगाल येथे जनता ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तसेच आपणही आपल्या शरद पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभे रहायला हवे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या मेळाव्यास माजी महिला जिल्हाध्यक्ष अनुपमा पाथ्रीकर, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख