NCP Congress to help PWP in Panvel | Sarkarnama

शेकापच्या मदतीला काँग्रेस- राष्ट्रवादीची फौज

संदीप खांडगेपाटील
शनिवार, 29 एप्रिल 2017

भाजपा व रिपब्लिकन(आठवले गट) यांची युती, शेकाप-मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी, एमआयएम-रिपब्लिकन(आंबेडकर गट)- आगरी सेना-संभाजी ब्रिगेड यांची तिसरी आघाडी आणि या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने पनवेल निवडणुकीकरता ‘एकला चलो’चा नारा देत स्वबळावर निवडणूका लढविण्याची सुरू केलेली तयारी, या पार्श्‍वभूमीवर पनवेल महापालिकेची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे चित्र पहिल्या टप्प्यात निर्माण झाले आहे.

मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीकरता भाजपा, शेकाप या दोन राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भाजपा व शिवसेना युती तुटल्यामुळे शेकापप्रणित आघाडीचा उत्साह दुणावला आहे. शेकापप्रणित आघाडीचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री पनवेलमध्ये प्रचाराची धुरा सांभाळताना लवकरच दिसतील.

भाजपा व रिपब्लिकन(आठवले गट) यांची युती, शेकाप-मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी, एमआयएम-रिपब्लिकन(आंबेडकर गट)- आगरी सेना-संभाजी ब्रिगेड यांची तिसरी आघाडी आणि या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने पनवेल निवडणुकीकरता ‘एकला चलो’चा नारा देत स्वबळावर निवडणूका लढविण्याची सुरू केलेली तयारी, या पार्श्‍वभूमीवर पनवेल महापालिकेची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे चित्र पहिल्या टप्प्यात निर्माण झाले आहे.

एमआयएमकडून ओवेसी बंधूंच्या सभा व रॅली आयोजित करण्यासाठी धावपळ सुरू झाली असून रिपब्लिकन गटांकडून रामदास आठवले व प्रकाश आंबेडकरांच्याही सभा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य पाच ते सहा मंत्र्यांच्या सभा निश्‍चित करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या प्रचाराची रूपरेषा पक्षाचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर निश्‍चित करत असून रायगड जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर त्यांना सहकार्य करत आहेत. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची सभा व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंची रॅली प्रचारादरम्यान निश्‍चित करण्यात आली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेदेखील पनवेलच्या प्रचार अभियानात सक्रिय सहभागी होणार आहे. अनंत गीते, आनंदराव आडसूळांसह शिवसेना आमदार व नेतेमंडळी पनवेलमधील शिवसैनिकांच्या मदतीला प्रचाराकरता येणार आहेत.

भाजपा-सेना युती तुटल्यामुळे शेकापप्रणित महाआघाडीचा महापालिकेत सत्ता मिळविण्याचा आत्मविश्‍वास वाढीस लागला आहे. महाआघाडीकडून काँग्रेसचे अधिकाधिक माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना प्रचारात सहभागी करून घेतले जाणार आहे. शेकापची प्रचार धुरा माजी आमदार व शेकापचे नेते विवेक पाटीलच सांभाळणार असून शेकापकडून प्रचाराकरता गणपतराव देशमुख व जयंत पाटील या मातब्बर नेत्यांना मैदानात उतरविले जाणार आहे.

महाआघाडी, महायुती, तिसरी आघाडी आणि स्वबळावर लढणारी शिवसेना यांनी प्रचार अभियानाकरिता अधिकाधिक नेतेमंडळी उतरविण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रचाराचे यशापयश शेकापचे विवेक पाटील आणि भाजपाचे रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक रणनीतीवर निश्‍चित होणार असल्याचे पनवेलवासियांकडून सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख