ncp congres | Sarkarnama

आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे सरकारकडून संकेत

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई : गेल्या तीन दिवसापासून निलंबनाच्या मुद्द्यावर विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. 
त्यामुळे, विरोधी पक्षातील 19 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत सरकारच्या वतीने आज विधानसभेत देण्यात आले. 
सत्ताधारी व विरोधक ही एकाच रथाची दोन चाक असून आमच्या सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आम्हालाही आनंद होत नसल्याचे निवेदन संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केले आहे. 

बापट म्हणाले, आमदारांचे निलंबन शिस्त भंगाच्या कारणामुळे करण्यात आले होते. आता हे निलंबन मागे घेणारच नाही असे नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत विरोधी पक्षांचे आगळेवेगळे व महत्त्वाचे स्थान असून सत्ताधारी व विरोधक ही एकाच रथाची दोन चाके असल्याचेही बापट यांनी सांगितले. गेले दोन दिवस कामकाजात विरोधक नाहीत याची आम्हाला सातत्याने जाणीव होत असल्याचे सांगत या मुद्द्यावर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, गटनेत्यांच्या अनेक बैठका झाल्या, यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केले असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. निलंबनाच्या मुद्द्यावर सरकारही सकारात्मकच असून अधिवेशन संपण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे कामकाजाच्या पुढच्या दिवशी, बुधवार, दि. 29 रोजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेते यांची बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन बापट यांनी यावेळी बोलताना दिले. 

सरकारची ही भूमिका स्पष्ट करत येत्या 29 तारखेला विरोधकांनी सन्मानाने या सभागृहात यावे असे आवाहन बापट यांनी विरोधी पक्षांना केले. विरोधी पक्ष हे आमचे सहकारी असून आमच्या सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आम्हालाही काही आनंद होत नसल्याचे गिरीश बापट यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांचे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान गोंधळ घातल्याबद्दल दि. 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले होते. यानंतर निलंबन मागे घेईपर्यंत विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. गेले दोन दिवस विरोधकांच्या रिकाम्या बाकांसमोरच विधानसभेचे कामकाज चालू होते. या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या या स्पष्टीकरणामुळे सरकारने आता विरोधकांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 

संबंधित लेख