ncp confirm vijaysinh mohite patils ticket | Sarkarnama

देशमुखांची चर्चा फक्त सोशल मिडीयात, मोहिते पाटीलच माढ्यात!

​संपत मोरे 
बुधवार, 23 जानेवारी 2019

प्रभाकर देशमुख यांची नेमकी कोणत्या फडात कोणासोबत लढत होणार?

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची चर्चा राष्ट्रवादीकडून सुरु झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता मोहिते पाटील यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. 

निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही माढा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, म्हणून दौरे सुरु केले आहेत. त्यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय पण त्यांना उमेदवारी मिळावी, अशी ठाम मागणी माढा मतदारसंघातील एकही शक्तिशाली नेता करताना दिसत नाही.  

प्रभाकर देशमुख सेवेत असताना त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा व्हायची, मात्र त्यांच्या निवृत्तीच्या दिवसापासून ही चर्चा जोरात सुरु आहे. देशमुख यांनीही माढा मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्क सुरु केला आहे. त्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. मात्र या मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी अजूनतरी निवडणुकीबाबतचे भाष्य केलेले नाही. त्यामुळे त्यांना डावलून  देशमुख यांना उमेदवारी कशी मिळेल? असा प्रश्न विचारला जात आहे. 

देशमुख यांच्या नावाची चर्चा झाली तरी मोहिते पाटील गटातील खंदे समर्थक अस्वस्थ होताना दिसत आहेत. पक्षाने देशमुख यांना उमेदवारी दिली तर हा गट शांतपणे देशमुख यांच्या प्रचारात सक्रिय होईल, असे सध्याचे तरी चित्र नाही. 

प्रभाकर देशमुख यांचे लोधवडे गाव माण विधानसभा मतदारसंघात आहे. ते लोकसभेची तयारी करून विधानसभेला या जागेसाठी आग्रह धरू शकतात, मात्र राष्ट्रवादीला ही जागा काँग्रेस सोडेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे देशमुख यांना उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय आखाडयात उतरण्यासाठी सरसावलेले देशमुख यांची नेमकी कोणत्या फडात कोणासोबत लढत होणार, हे चित्र आजघडीला तरी अस्पष्ट आहे. 
 

संबंधित लेख