कोपर्डीत भाजपच्या साथीने राष्ट्रवादीची सत्ता! 

कोपर्डीत भाजपच्या साथीने राष्ट्रवादीची सत्ता! 

नगर : जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस या तिनही पक्षांनी आपलेच सरपंच जास्त संख्येने आल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात 205 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील भारतीय जनता पक्षाने 108 ग्रामपंचायतींचे सरपंच आपले असल्याचा दावा केला. कॉंग्रेसने 68 तर राष्ट्रवादी कॉग्रेसने 64 ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. ही आकडेवारी पाहता 35 सरपंचांवर अनेक पक्षांनी दावा केला आहे. दरम्यान, अत्याचारप्रकरणामुळे देशभर गाजलेल्या कर्जत तालुक्‍यातील कोपर्डीची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मिळवली आहे. राष्ट्रवादीला भाजपने मदत केली. 

कर्जत तालुक्‍यात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे वर्चस्व कायम राहिले. त्यामुळे भाजपची घौडदौड चालूच असल्याचे दिसून आले. तालुक्‍यात आठ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपचे, तर राष्ट्रवादीला एक सरपंचपद मिळाले. बहुचर्चित कोपर्डी येथे भाजपच्यामदतीने राष्ट्रवादीला विजय मिळवला. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड यांच्या नेतृत्त्वाखालील कार्यकर्त्यांनी विजय मिळविला. 

नगर तालुक्‍यातील बहुतेक गावांवर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व आहे. तालुक्‍यातील बराचसा भाग श्रीगोंदे मतदार संघात येत असल्याने राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही लक्ष दिले होते. सोनेवाडी येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांच्या पॅनेलला राजेंद्र बेरड यांनी पराभूत केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या वाळकी येथील पॅनेलला पराभव स्विकारावा लागला. आगडगाव येथे भाजपच्या मच्छिंद्र कराळे या युवकाने मागील पंधरा वर्षाची एकहाती सत्ता असलेल्या यशवंत पालवे यांच्या सत्तेला धक्का दिला. बाबुर्डी बेंद येथे बाजार समितीच्या उपसभापती रेश्‍मा चोभे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. 

पारनेर तालुक्‍यातील एकूण 16 ग्रामपंचायतींपैकी सात शिवसेनेकडे, तर चार राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. म्हस्केवाडीत सरपंच व सदस्यपदासाठी निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्‍यात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा परिणाम ग्रामपंचायतीच्या निकालातही दिसून आला. जिल्हा परिषदेच्या ढवळपुरी गटातून पराभूत झालेल्या लिलाबाई रोहोकले भाळवणीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. 

कोपरगाव तालुक्‍यातून 26 सरपंचांपैकी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे गटाचे 13 , राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आशुतोष काळे गटाला सहा, राजेश परजने गटाचे एक, शिवसेनेचा एक असे सरपंच झाले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माहेगाव देशमुख येथे आमदार कोल्हे गटाने विजय मिळविला. हा निकाल म्हणजे राष्टवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांना धक्का आहे. राहाता तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींपैकी दहा सरपंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे निवडून आले. साकुरी ग्रामपंचायतीत मात्र गणेश साखर कारखान्याचे राजेंद्र दंडवते यांनी सरपंचाच्या निवडणुकीत बाजी मारली. गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरपंच दीपक रोहोम यांना पराभवाचा धक्का बसला. 

अकोले तालुक्‍यात 11 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादीचे सात सरपंच निवडून आले. राष्ट्रवादी कॉग्रेस विरुद्ध भाजप व शिवसेना अशी लढत दिसून आली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी जास्त ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी चास व लहित या दोन गावांत आपले कार्यकर्ते निवडून आणले. 

जामखेड तालुक्‍यातील रत्नापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन भाजपचे सूर्यकांत मोरे यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला. शिऊर ग्रामपंचायतीत बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर यांना यश मिळाले. राजुरीत प्रस्थापितांना धक्का देत भाजपच्या गणेश कोल्हे या तरुणाने सरपंचपद मिळविले. श्रीगोंदे तालुक्‍यातील दहापैकी सात ग्रामपंचायतींमध्ये कॉग्रेस आघाडी आणि तीन ठिकाणी भाजप समर्थकांची सत्ता आली. बेलवंडी, पारगाव सुद्रिक येथे बहुमत एकीकडे आणि सरपंचपद दुसऱ्या गटाला, अशी स्थिती झाली. एकूणच भाजपचे नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्त्वापेक्षा कॉग्रेसचे नागवडे यांचे नेतृत्त्व वरचढ होऊ लागले असल्याचे चित्र तालुक्‍यात निर्माण होऊ लागले आहे. श्रीरामपूर तालुक्‍यात सहा पैकी पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी मतदान झाले. कमलापूरची ग्रामपंचायत बिनविरोध झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या गटाकडे बहुतेक ग्र्रामपंचायतींचा कल राहिला. अनेक ठिकाणी कॉग्रेस-भाजपची युती झालेली दिसून आली. 

नेवासे तालुक्‍यात 13 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमध्ये लढती झाल्या. क्रांतिकारी पक्षाचे नऊ सरपंच विजयी झाली. त्यामुळे नेवासे तालुक्‍यात गडाख यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. राहुरी तालुक्‍यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा वरचष्मा राहिला. ब्राम्हणगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तुळजापूर ग्रामपंचायतीत मात्र विखे गटाच्या पराभवासाठी कर्डिले व माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे गट एकत्र आले होते. 

शेवगाव तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादीने आठ, तर भाजप व स्थानिक आघाडीने प्रत्येकी दोन सरपंचपद मिळविण्यात यश मिळविले. मात्र राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य मंगेश थोरात यांच्या खानापूर गावात सरपंचपदासाठी भाजपचा उमेदवार निवडून आला. माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्या गटाने नेवासे तालुक्‍यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. दिवंगत नेते राजीव राजळे यांच्या गटाला मात्र दोन जागांवरच समाधान मानावे लागले. 

संगमनेर तालुक्‍यात 38 ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. बहुतेक ग्रामपंचायतीत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलचे वर्चस्व कायम राहिले. विखे पाटील गटाकडे मात्र तीनच ग्रामपंचायती राहूशकल्या. इतर बहुतेक सर्वच ग्रामपंचायतींवर थोरात गटाचे वर्चस्व सिद्ध झाले. पाथर्डी तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिगत प्रतिमेलाच प्राधान्य दिलेले दिसून आले. तिसगावमध्ये ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे यांनी गेल्या चाळीस वर्षांची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. कोल्हारमध्ये माजी सभापती संभाजी पालवे, भालगावात भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी एकहाती सत्ता खेचून आणली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com