NCP agitation at Mantralay | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  गांधी पुतळ्याजवळ मौनव्रत आंदोलन

मृणालिनी नानिवडेकर 
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

महात्मा गांधीजींची तत्वे आणि सत्ताधारी भाजप सरकारची आत्ताची तत्वे या फलकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवण्यात आलेल्या जवाब दो मोहिमेतील प्रश्नांचे फलकही याठिकाणी लक्ष वेधून घेत होते.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाने सुरू ठेवलेल्या दमन नीतीचा निषेध करण्यासाठी आज मंत्रालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,  मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,आमदार विक्रम काळे, आमदार विदयाताई चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते या आंदोलनात सामील झाले होते.

तोंडाला काळ्या पटटया बांधलेल्या या नेत्यांनी सकाळी 9 ते दुपारी 12 तोंडाला काळी पटटी बांधून सत्याग्रहाप्रमाणे ठिय्या दिला होता.

सुरुवातीला महात्मा गांधींजींच्या पुतळयाला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. ९ ते १२ वाजेपर्यंत धरणे आणि मौनव्रत आंदोलन केल्यानंतर माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींजींच्या पुतळयालाही पक्षाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.  

राफेल विमानांची खरेदी, सनातनला दिलेले मुक्‍तव्दार तसेच शेतकरी आत्महत्यांचे फलक लावून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला. सत्य , अहिंसा ,शांती ही महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली तत्त्वे होती तर या सरकारने असत्य ,हिंसा आणि अशांती या त्रिसुत्रीचा अंगीकार केला असल्याचे फलक लावण्यात आले होते. 

प्रारंभी केवळ ठिय्या देवून बसलेल्या या आंदोलकांनी नंतर तोंडाला काळ्या पटट्‌या लावल्या,त्यामुळे मौनाबरोबरच निषेध अशी दुहेरी धार आली होती. राफेल विमाने बनवण्याची क्षमता एअएएल कंपनीची क्षमता नाही हें विधान असत्य आहे. सनातनवर बंदी न घालणे म्हणजे हिंसाच आहे असे आरोप या फलकांव्दारे करण्यात येत होते.

आंदोलनाचा कालावधी संपल्यानंतर हे मौनव्रतातले आंदोलन असल्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता नेते निघून गेले. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मौनव्रत आंदोलन आयोजित केले होते. कॉंग्रेसने सेवाग्राम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली असतानाच हे आंदोलन झाले हे विशेष.

संबंधित लेख