ncp action paln in nagar | Sarkarnama

'सासऱ्याच्या पक्षा'साठी निष्ठेने राबलेल्या आमदाराची हकालपट्टी राष्ट्रवादी करणार?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 डिसेंबर 2018

भाजपसोबत युती करायची नाही, असे आदेश वरिष्ठ नेत्यांचे स्पष्टपणे होते. त्याचा मी साक्षीदार आहे. परंतु हा आदेश पाळला नाही.

- राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष

नगर : महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संबंधित श्रेष्ठी व नगरसेवकांना भाजपसोबत युती करायची नाही, असा स्पष्ट आदेश दिला होता. तथापि, त्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेवून येत्या सात दिवसांत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रसंगी पक्षातून हकालपट्टीही होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महापौर, उपमहापौरपद भाजपला मिळाले. यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मते दिली. 

महापालिका निवडणुकीत नगरसेवकांच्या जागा शिवसेनेला सर्वांत जास्त, नंतर राष्ट्रवादी व भाजप तीन नंबरला होता. असे असताना भाजपला महापौर व उपमहापौर पद मिळाले. ही जादू भाजपने केली असली, तरी त्यांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी साथ दिली. पक्षादेश धुडसावून दिलेली ही साथ राष्ट्रवादीला जिव्हारी लागली आहे. 

याबाबत जिल्हाध्यक्ष फाळके यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी युवक उपाध्यक्ष किरण काळे, सबाजी गायकवाड उपस्थित होते.

फाळके म्हणाले, काँग्रेसबरोबर राहून राष्ट्रवादीने लढावे. जुळवाजुळवी होत नसेल, तर अनुपस्थित रहावे, पण भाजपसोबत युती करायची नाही, असे आदेश वरिष्ठ नेत्यांचे स्पष्टपणे होते. त्याचा मी साक्षीदार आहे. परंतु हा आदेश पाळला नाही. आता संबंधित नगरसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत. येत्या सात दिवसात त्यांचे उत्तरे येतील. त्यावर चर्चा होऊन काय कारवाई करायची, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. प्रसंगी पक्षातून काढून टाकण्याचाही कठोर निर्णय घेतला जाईल, असे फाळके यांनी स्पष्ट केले. 

फाळके यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेतला त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, नगरसेवकांनी कोणाच्या इशाऱ्यावर गद्दारी केली, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

संबंधित लेख