Navneet Rana says Meeting with Ajit Pawar was personal | Sarkarnama

अजित पवारांची भेट व्यक्तिगत, राजकारणाच्या नजरेने पाहू नका  : नवनीत राणा 

सुरेंद्र चापोरकर 
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

अजित पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीला खूप मदत केली होती. ते अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी ही खासगी भेट होती.

अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेली भेट व्यक्तीगत पातळीवरील होती. या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री व अपक्ष आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.

परिवर्तन यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी अमरावतीत होते. अमरावतीला आल्यानंतर जयंत पाटील व अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या घरी भेट दिली होती. यावेळी नवनीत राणा सुद्धा आल्या होत्या. त्यांनी अजित पवार व जयंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीने पुन्हा जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर त्या पक्षात सक्रिय राहिल्या नाहीत. परिवर्तन यात्रेतही त्या सहभागी झाल्या नाहीत. अजित पवार व जयंत पाटील यांची भेट घेतल्याने त्या पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार राहतील काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

या चर्चेबद्दल ' सरकारनामा'शी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "अजित पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीला खूप मदत केली होती. ते अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांच्याप्रती आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी ही खासगी भेट होती. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण स्वागत करतो. याच भावनेतून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. यावेळी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीकडे राजकारणाच्या नजरेने पाहू नये", असेही नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख