Navneet Rana leading the race in Amravati Congress | Sarkarnama

अमरावतीत कॉंग्रेसमध्येही नवनीत राणा टॉपवर 

सुरेंद्र चापोरकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

अमरावती लोकसभा मतदारसंघ पुन्हा कॉंग्रेसकडे आल्यास काही नावे आघाडीवर असले तरी यातून नवनीत राणा बाजी मारतील, अशी शक्‍यता आहे.

अमरावती :  अमरावती लोकसभा मतदारसंघ पुन्हा कॉंग्रेसकडे आल्यास काही नावे आघाडीवर असले तरी यातून नवनीत राणा बाजी मारतील, अशी शक्‍यता आहे. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी नवनीत राणा यांचे नाव शर्यतीत असल्याचे कबूल केले आहे. 

अमरावती लोकसभा मतदारसंघ पुन्हा कॉंग्रेसकडे येण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही तसे संकेत स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना दिले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला अमरावती मतदारसंघात कॉंग्रेसची बाजू कोण लढविणार? यासंदर्भात अद्यापही निश्‍चित नसले तरी काही नावे समोर आले आहेत. यात माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, नवनीत राणा, अमरावती जिल्हा परिषदेचे सभापती बळवंत वानखेडे व कॉंग्रेस नेते किशोर बोरकर यांचा समावेश आहे. 

या सर्वांमध्ये नवनीता राणा यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. मुकुल वासनिक यांचा रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मानस असून त्या दृष्टीने त्यांनी रामटेकमध्ये जनसंपर्काला सुरूवात केली आहे. बळवंत वानखेडे, किशोर बोरकर यांच्यापेक्षा राजकीय वजन वापरून नवनीत राणा कॉंग्रेसची उमेदवारी मिळवू शकतात, असे मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी भारिप-बहुजन महासंघ व एमआयएमसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कॉंग्रेसच्या उमेदवारांबद्दल बोलताना अमरावती जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले, अमरावती जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. अद्यापही अमरावती जि. प. कॉंग्रेसकडे आहे व जिल्ह्यात दोन आमदारही निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यावयाची आहे. याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील परंतु काही उमेदवारांची नावे आम्ही पक्षश्रेष्ठीला सांगितली आहे. यात नवनीत राणा यांचेही नाव असल्याच्या वृत्ताला देशमुख यांनी दुजोरा दिला. 

नवनीत राणा यांनी आदिवासीबहुल मेळघाट भागात जनसंपर्काला सुरूवात केली आहे. या भागातील आदिवासींना अद्यापही इंदिरा गांधी यांच्याबद्दल प्रेम आहे. हा धागा पकडून ' नवनीत राणा तुफान नही आंधी है, मेलघाट की इंदिरा गांधी है' अशा घोषणा देत कार्यकर्ते मेळघाट परिसर पिंजून काढत आहे. दिवाळीनिमित्त राणा दाम्पत्य मेळघाटमध्ये काही दिवस होते. यावरून नवनीत राणा यांचे पावले कॉंग्रेसच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे.
 

संबंधित लेख