navnath gore story | Sarkarnama

'फेसाटी' लिहलेल्या नवनाथचं निगडीतलं घर त्यादिवशी हुमसून रडत होतं! 

संपत मोरे 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

ज्या घरात अंड्याची पोळी करून खाणं, ही मोठी गोष्ट वाटते त्या घरातलं हे लेकरु आहे. 

"वर्षानुवर्षांचा दुष्काळ, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, सामान्य माणसाची होणारी परवड आणि जगण्याची दररोजची लढाई यातूनच फेसाटी आकारला आली', असं मत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केले. 

जत तालुक्‍यातील निगडी येथील नवनाथ गोरे हे नाव अचानक साहित्य विश्वात चर्चेत आलं आहे. साहित्याच्या क्षेत्राशी लहानपणापासून बिलकुल संबंध न आलेल्या या तरुणाने आजवरच्या जगण्याची झाडाझडती लिहून काढली. 

गोरे सांगतात, हे लिहीणं माझी गरज होती. मी किती दिवस हा कटू आठवणींचा बोझा उरावर वागवत फिरणार होतो ? लिहिलं तेव्हा बरं वाटलं. याचं पुस्तक निघावं आणि पुरस्कार मिळावा हे स्वप्नातदेखील नव्हतं. लिहिलं ते दुःख कमी होण्यासाठी, पुरस्कार नंतरचा विषय झाला.' सुरुवातीला माझ्या सरांनी रणधीर शिंदे यांनी हे पुस्तक एका नावलौकिक मिळवलेल्या प्रकाशन संस्थेला पाठवलं होतं पण त्या संस्थेनं नकारार्थी शेरेबाजी करत पुस्तक नाकारलं. पण सर खचले नाहीत आणि मीही नाउमेद झालो नाही कारण पुस्तक लिहिलं तेव्हाच सगळी दुःख मांडून झालेली होती. आजवर अनेक नकार पचवत आलो होतो मग या नकाराचं काहीही वाटलं नाही. ते छापलं पाहिजेच असा अट्टाहास नव्हता.

नंतर काही दिवसांनी फेसाटी निघालं. वाचकांचे फोन यायला लागले. एक दिवस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाल्याची बातमी आली. बातमी ऐकल्यावर पहिल्यांदा माझं गाव, माझं दुष्काळी शिवार, माझं झोपडीवजा घर, माझे आई वडील, माझा अपंग भाऊ यांची आठवण आली. आजवर जगलेल्या सगळ्या आठवणी डोळ्यांतून बाहेर यायला लागल्या. 

ज्या भागातून नवनाथ गोरे आले तो जत तालुका. सांगली जिल्हयाच्या पूर्व भागातील दुष्काळी तालुका. या तालुक्‍यात आजवरच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे विकास खुंटला आहे. सगळ्यात भीषण अडचण पाण्याची. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची वाट पहाणं आजही या तालुक्‍याच्या नशिबी आहे. या तालुक्‍याच्या पाचवीला वर्षानुवर्षं दुष्काळ पुजलेला. पोटासाठी घराला कुलूप लावून गावाच्या ग्रामदेवतेला "येतो बाबा एकदाचा' असा नमस्कार करून जायचं. मग जगायला जायचं समृद्धीच्या प्रदेशात. ऊस तोडायला. कारखाण्याच्या परिसरात खोपट उभारून रहायचं, रोज सकाळी उसाच्या फडात जायचं. 

फेसाटी कादंबरीचा लेखक नवनाथ हेही ऊसतोड मजुरी करणारे. आई वडिलांसोबत उसतोडणीला जाणारे. शिक्षणाकडे कसलंही लक्ष देता येत नव्हतं. दहावीला पाच वेळा नापास झाला, कारण शाळेत जाताच येत नव्हतं. शाळा शिकायची तर खायचं काय? हा सवाल पुढं होता. त्यानंतर थोडं लक्ष दिल्यावर दहावी पास झाला, मग आई म्हणाली, नाथा तू आता शिकलं पायजेल. मग नाथा बारावी, पदवीधर झाला. कोल्हापूरला एम ए साठी आला. तिथं एटीमवर नोकरी करून थोडे पैसे स्वतःला ठेवून बाकीचे घरी पाठवत राहिला. 

याच काळात डॉ राजन गवस, रणधीर शिंदे यांच्यासारखी माणसं भेटली. रणधीर शिंदे यांनी नाथाला सगळे अनुभव लिहून काढायला लावले.स्वतः पुढाकार घेऊन नाथाच्या आयुष्याची फेसाटी पुढं आणली. त्याच फेसाटीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळेपर्यत हा लेखक भल्या भल्या साहित्यकारांना माहिती नव्हता. आज सर्व लोक नवनाथ गोरे यांना बोलवतात, त्याचा सत्कार करतात. पण नवनाथच्या सत्कारासोबत त्याच्या आयुष्याची फेसाटी कमी करणं, त्याची जगण्याची लढाई थांबवून त्याला स्थिर नोकरी मिळणं हाच नवनाथचा खरा सत्कार होईल. बघता बघता वर्ष निघून जाईल. पुढच्या वर्षी नवा लेखक हा पुरस्कार मिळवेल मग त्याची चर्चा सुरु होईल. नवनाथ मागं पडेल. 

नवनाथच्या कुटुंबाची सद्यस्थिती समजून घ्यायची असेल तर या प्रसंगातून कळेल. 
"पुरस्कार मिळाला तेव्हा कोल्हापुरात हुतो. दोन आठवड्यान गावाकडं गेलो. मी दारात गेल्यावर आई पळतच माझ्याकडं आली तीनं कवळा घातला. हुमसून रडायला लागली. बापबी रडायला लागला. आणि भावबी माज्याकडे बघून रडत होता. आम्ही चौघं रडत होतो. आमच रडणंआनंद झाला म्हणून हुतं. त्यादिवशी रात्री आयन सगळ्याला अंड्याच्या पोळ्या केल्या. आमी रातभर बोलतं बसलेलो. जे जगलो तेच पुन्हा आमचं आमी सांगत हुतो.' 
ज्या घरात अंड्याची पोळी करून खाणं, ही मोठी गोष्ट वाटते त्या घरातलं हे लेकरु आहे. 

संबंधित लेख