नवी मुंबईतील शिवसेनेत नाराजी 

स्थायी समितीच्या सदस्यपदाच्या राजीनाम्यावरून नवी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली दुही महागात पडण्याची शक्‍यता आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी पक्षाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे.
नवी मुंबईतील शिवसेनेत नाराजी 

नवी मुंबई : स्थायी समितीच्या सदस्यपदाच्या राजीनाम्यावरून नवी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली दुही महागात पडण्याची शक्‍यता आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी पक्षाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी पक्षातील महत्त्वाच्या पदांची घोषणा केल्यानंतर नेतेपदी एकनाथ शिंदे व उपनेतेपदी विजय नाहटा यांची वर्णी लागली. त्यानंतर सत्कार समारंभ व नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा ठेवण्यात आला होता; मात्र त्याला विजय चौगुले यांची अनुपस्थिती लक्ष वेधणारी ठरत होती. 

यानंतर नवी मुंबईतील नेरूळ विभागात सध्या हळदी-कुंकू व महानगर घरगुती गॅसच्या उद्‌घाटनांचा सपाटा लागला आहे. या कार्यक्रमांना शिवसेनेचे बडे नेते उपस्थित असताना चौगुले मात्र गायबच होते. 

अनेक दिवसांपासून जिल्हाप्रमुखांच्या रिक्तपदासाठी शिवसेनेकडून नवीन नेत्यांचा विचार सुरू असल्यामुळे चौगुले नाराज असल्याचे बोलले जाते. यात नगरसेवक एम. के. मढवी, पक्ष प्रतोद द्वारकानाथ भोईर, नगरसेवक शिवराम पाटील यांच्यासह पक्षातील आयरामांच्या नावाची चर्चा आहे; मात्र जिल्हाप्रमुखपद ज्येष्ठ नेत्याला द्यावे. बाहेरून आलेल्यांना ते देऊ नये यासाठी चौगुले आग्रही आहेत. 

महापालिका निवडणुकीत बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेत अगोदरच नाराजी वाढलेली आहे. आता पुन्हा जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारीही आयरामांच्या गळ्यात घातली, तर प्रमुख विरोधी पक्ष असलेली शिवसेना रसातळाला जाईल, अशी भीती चौगुले गटाकडून व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर चौगुले समर्थक नगरसेवकांची नाराजीही शिवसेनेला ओढवून घ्यावी लागणार आहे. सध्या महापालिकेत 20 चौगुले समर्थक नगरसेवक आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने चौगुले गटाची नाराजी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नक्कीच परवडणारी नाही. 

बड्या नेत्यांमध्ये स्पर्धा 
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अंतर्गत कलहामुळे हातातील सत्ता गेल्यानंतरही शिवसेनेला शहाणपण आलेले नाही. शिवसेनेची कणखर भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले सध्या दुर्लक्षित आहेत. ऐरोली मतदार संघातील उमेदवारीपासून ते नवी मुंबई जिल्हाप्रमुखपर्यंतच्या पदांवरून शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये स्पर्धा आहे; परंतु ही चुरस स्पर्धेपुरती मर्यादित न राहता नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेचे पानिपत होण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत. याबाबत चौगुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com